Bhosari Crime News : किरकोळ कारणावरून दोघांवर खुनी हल्ले; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

एमपीसी न्यूज – एमआयडीसी भोसरी मधील फुलेनगर येथे चार जणांनी किरकोळ कारणावरून दोघांवर खुनी हल्ले केले. याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि. 11) रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली.

डीप्श्या उर्फ सूरज गायकवाड, जावेद नदाफ (दोघे रा. फुलेनगर, एमआयडीसी भोसरी), अजय ससाणे, अण्ण्या हजारे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पहिल्या प्रकरणात आता प्रवीण बबन लांडगे (वय 23, रा. फुलेनगर, एमआयडीसी) भोसरी यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास आरोपी सूरज गायकवाड याने फिर्यादी यांना ‘तू आमच्याकडे का बघतो. तुला लय माज आला का? तुला खल्लास करून टाकतो’, अशी दमबाजी केली. त्यानंतर सूरज गायकवाड आणि जावेद नदाफ या दोघांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात कोयत्याने वार केले. तर अन्य दोन आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

दुसऱ्या प्रकरणात अस्लम हनीफ चाकोरे (वय 32, रा. फुलेनगर, एमआयडीसी भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादी यांचा मेहुणा आमीर याला मारहाण केली. त्याचा फिर्यादी यांनी आरोपींना जाब विचारला. त्यावरून आरोपी सूरज गायकवाड आणि जावेद नदाफ यांनी फिर्यादी यांना ठार मारण्याच्या उद्देशाने शस्त्राने डोक्यावर, हातावर वार करून गंभीर जखमी केले. अन्य आरोपींनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.