Bhosari Crime News: दोन अट्टल चोरट्यांना खंडणी दरोडा विरोधी पथकाकडून अटक

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जाऊन पादचाऱ्यांच्या हातातील मोबाईल फोन चोरणा-या दोन अट्टल चोरट्यांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली. रविवारी (दि. 20) सायंकाळी सव्वासहा वाजता दिघीच्या मॅगझीन चौकाजवळ ही कारवाई करण्यात आली.

हिमांशू योगेश सोळंकी (वय 20, रा. चौधरी पार्क, दिघी),  प्रज्वल संजय जांबे (वय 20, रा. रुणवाल पार्क, दिघी) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी खंडणी/दरोडा विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी शहरातील टॉप 25, फरारी आरोपिंचा शोध घेत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस नाईक किरण काटकर व नितीन लाेखंडे यांना मिळाली की, एका पल्सर मोटरसायकलवर (एम एच 12 / के व्ही 6951) दोन तरुण मॅगझीन चौक दिघी येथे थांबले आहेत. त्यांच्याकडे एक महागडा मोबाईल फोन असून तो चोरीचा आहे.

या माहितीनुसार पोलिसांनी मॅगझीन चौकात सापळा लावून हिमांशू आणि प्रज्वल या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या मोबाईल फोनबाबत चौकशी केली असता तो चोरीचा असल्याचे त्यांनी सांगितले.

इंद्रायणी नगर, भोसरी येथे एका पादचारी व्यक्तीच्या हातातून तो मोबाईल चोरी केला होता. याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक करून मोबाईल फोन आणि दुचाकी असा एक लाख 30 हजारांचा ऐवज जप्त केला.

आरोपी हिमांशू सोळंकी हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर दिघी येथे दोन, वाकड, हडपसर, वडगाव मावळ, फरासखाना पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे सहा चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी प्रज्वल याच्यावर दिघी पोलीस ठाण्यात एक चोरीचा गुन्हा दाखल आहे. दोन्ही चोरट्यांना पुढील कारवाईसाठी एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.