Bhosari Crime : पूर्ववैमनस्यातून तरुणावर धारदार शस्त्राने वार करणा-यास खंडणी दरोडा विरोधी पथकाकडून अटक

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर आठ जणांच्या टोळक्‍याने धारदार शस्त्राने वार केल्याची घटना गणेशनगर, बोपखेल येथे रविवारी (दि. 4) पहाटेच्या सुमारास घडली. त्यातील एका आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे.

आकाश अर्जुन गिरी (वय 23, रा. साई चौक, पाटील वाडा, बोपखेल) असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याच्यासह सोन्या तांबे (रा. गणेशनगर, बोपखेल), बाबू ठाणगे (रा. साई चौक, बोपखेल), दिवाकर सिंग (रा. दिघी) आणि त्यांचे चार साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिकेत विजय कांबळे (वय 23, रा. रामनगर, बोपखेल) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिकेत कांबळे हा गणेशनगर, बोपखेल येथे उभा असताना त्याठिकाणी आठ आरोपी आले. एक महिन्यांपूर्वी अनिकेत याचे आकाश गिरी याच्यासोबत भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी अनिकेत यास शिवीगाळ करीत लाकडी बांबूने मारहाण करीत धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले.

खंडणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस गस्त घालत असताना पोलीस हवालदार काळे आणि पोलीस शिपाई डोळस यांना माहिती मिळाली की, वरील गुन्ह्यातील मुख्य आरोपी आकाश हा मरकळ रोड आळंदी येथील एका हॉटेलसमोर थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लाऊन आकाश गिरी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.

आरोपी आकाश गिरी याला पुढील कारवाईसाठी दिघी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.