Bhosari : तडीपार सराईत गुन्हेगार गुन्हे शाखा युनिट एकच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – दोन वर्षांसाठी तडीपार केलेला गुन्हेगार शहरात आढळून आल्याने त्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल अशोक गायकवाड (वय 20, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) असे अटक केलेल्या तडीपार केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 20) गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस शिपाई सचिन मोरे यांना माहिती मिळाली की, एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार भोसरी बालाजीनगर येथील रमाई आंबेडकर कमानीजवळ येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याला सापळा रचून शिताफीने पकडले.

आरोपी अमोल हा एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर दरोडा, दरोड्याची तयारी, गंभीर दुखापत असे तीन गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. आरोपी अमोल याला दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. पोलिसांची परवानगी न घेता तो हद्दीत आल्याने त्याला अटक करून त्याच्यावर मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

2016 मध्ये आरोपी अमोल याने त्याचे साथीदार सतीश कु-हाडे, प्रशांत पालेवार, आकाश शिरसाठ, आशिष काळे, सुरज कु-हाडे यांच्या सोबत मिळून एका कंपनीच्या बसला आडवून बस चालकाला मारहाण केली. बसमधील कामगारांना तलवारीचा धाक दाखवून लुटले होते. 2017 साली अमोल गायकवाड याला त्याचे साथीदार नितीन पवार, अतिश काळे, विनोद बाबर, कृष्णा भोसले यांच्यासोबत मिळून एमआयडीसी भोसरी परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी अटक केली होती.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, सहाय्यक पोलीस फौजदार रवींद्र राठोड, पोलीस कर्मचारी शिवाजी कानडे, बाळू कोकाटे, अमित गायकवाड, प्रमोद गर्जे, सचिन मोरे, विशाल भोईर यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.