Bhosari : दोन विद्यार्थ्यांच्या समयसूचकतेमुळे मांजात अडकलेल्या कोकिळेचे वाचले प्राण

एमपीसी न्यूज – चाळीस फूट उंचीवर खैराच्या झाडावर चिनी मांजामध्ये एक कोकिळा अडकली. सुटकेसाठी ती प्राणपणाला लावून तिचे प्रयत्न सुरु होते. झाडाखालून जाणा-या दोन विद्यार्थ्यांना ही कोकिळेची धडपड समजली. त्यांनी समयसूचकता दाखवत पक्षीप्रेमींना माहिती दिली आणि चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर मांजात अडकलेल्या कोकिळेला वाचवण्यात सर्वांना यश आले.

भोसरी मधील संत ज्ञानेश्वर उद्यानाजवळ उंच खैराचे झाड आहे. त्या झाडावर सकाळी एक कोकिळा चिनी मांजामध्ये अडकली. मांजातून स्वतःला सोडविण्यासाठी तिची फडफड सुरु झाली. दरम्यान, आयुष पथक आणि मनीष पथक हे दोघेजण झाडाखालून जात होते. कोकिळेची सततची फडफड दोघांच्या लक्षात आली. त्यांनी झाडावर बघितले, तर सुमारे चाळीस फूट उंचीवर एक कोकिळा अडकलेली त्यांना दिसले.

  • त्यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ प्रक्षिप्रेमींशी संपर्क साधला. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष-पर्यावरण अभ्यासक विजय पाटील, पक्षीप्रेमी सुरेश जाधव, रामचंद्र ससाणे, गल्लू भोळे, महेंद्र पाठक, विजय हिरे, दत्तात्रय साडेकर, संपत शिर्के यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

खैराचे झाड अतिशय उंच होते. सुमारे चाळीस फूट उंचीवर कोकिळा अडकली होती. लवकरात लवकर तिला वाचवणे आवश्यक होते. त्यामुळे सर्वांनी बांबू आणि कोयत्याच्या साहाय्याने कोकिळा बसलेली फांदी तोडली. यामुळे मांजात अडकलेल्या कोकिळेला मांजातून बाहेर पडता आले. पण, बाहेर पडत असताना कोकिळेच्या पंखाला जखम झाली. तिच्यावर तात्काळ प्रथमोपचार करण्यात आले. प्रथमोपचारानंतर काही काळ कोकिळेने विश्रांती घेतली आणि लगेच आकाशात पुन्हा एकदा उंच भरारी घेतली.

चिनी मांजात पक्षी अडकण्याच्या अनेक घटना आजवर घडल्या आहेत. पक्षीप्रेमी, निसर्गप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आजवर घार, बगळा, घुबड, कावळा अशा अनेक पक्ष्यांचा जीव वाचविण्यात आला आहे. पतंगासाठी वापरला जाणारा चिनी मांजा झाडांमध्ये अडकतो आणि तोच मांजा पुन्हा पक्ष्यांच्या प्रसंगी मानवाच्या देखील जीवावर बेततो. त्यामुळे अशा घातक मांजावर महापालिका आणि संबंधित विभागाने तात्काळ कारवाई करणे आवश्यक आहे, असे पर्यावरण अभ्यासक विजय पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.