Bhosari : स्वावलंबनातून समाजविकास घडतो- दादा इधाते

एमपीसी न्यूज – शिक्षण, स्वावलंबन आणि सन्मान यावर समाजाचा विकास अवलंबून असतो,” असे मत राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे माजी अध्यक्ष दादा इधाते यांनी व्यक्त केले. प्रभू विश्‍वकर्मा जयंतीनिमित्त लोहार उत्सव समितीतर्फे भोसरी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी निवृत्त न्यायाधीश द. रा. सम्राट, निवृत्त पोलिस उपअधीक्षक अशोक देशमुख, बारा बलुतेदार संघाचे उपाध्यक्ष प्रताप गुरव, नगरसेविका प्रियांका बारसे, उद्योजिका राजश्री गागरे, सामाजिक कार्यकर्ते कार्तिक लांडगे आदी उपस्थित होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव पडघमकर (भोसरी) यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या वतीने त्यांचे पुत्र सुनील पडघमकर यांनी पुरस्कार स्वीकारला. बेटी बचाव आंदोलनाचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. प्रमोद लोहार (नाशिक), अभिनेत्री नेहा पडघमकर (चाकण), आदर्श शिक्षिका सुहासिनी चव्हाण (सासवड), युवा कवयित्री मनीषा भालके (चाकण) यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविले. शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून वृक्षारोपण करण्यात आले.

इधाते म्हणाले, “भगवान विश्‍वकर्मा हे पहिले वास्तुविशारद होते. देवतांच्या वास्तूंची रचना त्यांनी केली होती. तीच परंपरा आपल्यापर्यंत चालत आलेली असून ती टिकवून ठेवण्याची आवश्‍यकता आहे.” समितीचे अध्यक्ष बाळासाहेब शेलार यांनी प्रास्ताविक केले. पीतांबर लोहार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रामदास लाड यांनी आभार मानले. महेश हरिहर, संजीव दाते, दत्तात्रेय अंकुशकर, भिवसेन लोहार, शिवाजी कळसे, औदुंबर कळसाईत, उमेश पाटमास, श्रद्धा लोखंडे आदींनी संयोजन केले.

पोपळकर पैठणीच्या मानकरी

भोसरीतील इंदुबन कार्यालयात भक्ती-शक्ती महिला मंडळातर्फे आयोजित “खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमात वनिता पोपळकर यांनी पैठणी पटकावली. पूजा चव्हाण व प्रियांका पोपळघट यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविला. प्रा. रामदास लाड व पूनम हळीकर यांनी खेळाचे सूत्रसंचालन केले. लकी ड्रॉमधील पैठणी आशा दुधवडे यांना मिळाली. रांगोळी स्पर्धेत संध्या लोहार (प्रथम- पैठणी), विद्या परेराव (द्वितीय), प्रियांका पोपळघट (तृतीय), पूजा डाखोरकर व आरती हरिहर (उत्तेजनार्थ) यांनी पारितोषिक पटकाविले. मुलांसाठीच्या रंगभरण स्पर्धेत विशाखा लोहार (प्रथम), श्रेया लोहार (द्वितीय), आदित्य कांबळे (तृतीय), श्‍लोक लोखंडे व रितेश डोंजे (उत्तेजनार्थ) यांनी पारितोषिक पटकाविले. मंडळाच्या अध्यक्षा भारती शेलार, कोमल लाड, श्रद्धा लोखंडे, डॉ. अश्‍विनी थोरात, सुनंदा लोहार, सुजाता टिंगरे, निर्मला दाते, सुनीता पवार आदींनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.