Bhosari: महापालिकेच्या उद्यानांमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक उद्यानात गैरप्रकार, नासधूस व चोरीच्या घटना वारंवार घडतात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या सर्व उद्यानांमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्याची मागणी, बहुजन हिताय बहुजन सुखाय सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालयाचे अध्यक्ष गिरीष वाघमारे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका उद्यानांवर चोरट्यांची वक्रदृष्टी झाली आहे. इंद्रायणीनगर पेठ क्रमांक 2 मधील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रा. रामकृष्ण मोरे उद्यानाच्या पाठीमागच्या बाजूस असणा-या लहान प्रवेशद्वाराचे लोखंडी गज उचकटून अज्ञात चोरट्यांनी 18 मार्च 2019 रोजी चोरीचा प्रयत्न केला.

याच उद्यानात यापूर्वीही कुलूप तोडण्याचे प्रकार घडले आहेत. या उद्यानातील असणा-या बुद्धविहारामध्ये मागील वर्षी चोरीची घटना घडली होती. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देखील करण्यात आली होती. त्यामुळे या उद्यानासह शहरातील सर्व उद्यानांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.