Bhosari : ‘ईडी’ची पिडा टळण्यासाठीच उद्धव ठाकरे यांचा अफझलखानाला मानाचा मुजरा – धनंजय मुंडे

एमपीसी न्यूज – शिवसेना-भाजप नेत्यांनी पाच वर्षात एकमेकांसोबत किती भांडणे केली. अझजल खान, वाघाच्या जबड्यात घालितो, हात मोजितो दात अशी भाषा केली. भाजप अध्यक्ष अमित शहा यांना अझफल खान म्हणत अझजलखानाचा कोथळा बाहेर काढण्याची भाषा केली होती. त्याच अफजलखानाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मानाचा मुजरा घातला अन्‌ जय गुजरात म्हणून महाराष्ट्रात आले. ईडीची पिडा टळण्यासाठीच उद्धव ठाकरे अफझलखानाच्या शामियानात मानाचा मुजरा करायला गेले होते, असा घणाघात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि. 24) आयोजित केलेल्या भोसरीतील सभेत मुंडे बोलत होते. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री, बार्शीचे आमदार दिलीप सोपल, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे यावेळी उपस्थित होते.

देशाची जनता ‘चौकीदार चोर आहे’ असे म्हणत आहे. तर, शिवसेना ‘चौकीदार म्हणू नका पहारेकरी म्हणा’ अशी सांगत होती. आज पहारेकरी आणि चौकीदार दोघेही चोर आहेत असा आरोप करत मुंडे म्हणाले, “देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करु, वर्षाला दोन कोटी रोजगार देऊ अशी स्वप्ने भाजपने दाखविली. परंतु, एकही स्वप्न पूर्ण करु शकले नाहीत. 15 लाख रुपयांच्या आश्वासनाने जनतेला फसविले. पाच वर्ष देशातील जनतेला वेड्यात काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हतबल झाले आहेत. निवडणुकीच्या सुरुवातीलाच भाजप निवडणूक हरल्याची मानसिकता मोदी यांच्या भाषणातून दिसून येत आहे”

“मेक इन इंडिया, स्कील इंडिया, उज्वला योजनांचा कुठल्या लोकांना फायदा झाला हे भाजपने सांगावे. काळा पैसा दशहतवाद्यांकडे जात आहे. त्यामुळे पैसा रोखल्यावर हल्ले थांबतील असे सांगितले. त्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेतला. परंतु, त्यानंतर देखील पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्याची जबाबदारी मोदी यांनी स्वीकारावी. शहीद झालेल्या जवानांच्या नावावर मते मागत आहे. यापुर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी शहीद जवानांच्या नावावर मते मागितली नाही” असेही मुंडे म्हणाले.

“देशाची निवडणूक असताना देशातील प्रश्नांवर चर्चा होत नाही. शिवाजीराव आढळराव यांना 15 वर्ष संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. 15 वर्षात विकास कुठे आढळला नाही. आज खासदार खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी 12 मंत्री येऊ द्या, पंतप्रधान येऊ द्या, मोदींना तर आणाच ट्रम्पला आणले तरी कोल्हे यांचा विजय कोणीच रोखू शकत नाही” असेही मुंडे म्हणाले.

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, “भोसरीत रेडझोन, शास्तीकर, अनधिकृत बांधकामाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. 100 टक्के शास्तीकर माफ होणे अपेक्षित आहे. अनधिकृत बांधकामे नियमित झाले पाहिजेत. रेडझोनने दिघी, भोसरी, चिखली, च-होली, वडमुखवाडी ही गावे बाधित आहेत. खासदार संरक्षण खात्याच्या समितीवर होते. 15 वर्षाच्या कालखंडात त्यांना रेडझोनचा प्रश्न सोडविता आला नाही”

भोसरीकरांच्या कळीचा प्रश्न असलेल्या रेडझोनबाबत खासदारांनी संसदेत एकही प्रश्न विचारला नाही. गल्लीत एक आणि दिल्लीत एक भूमिका घेतली जाते. त्यामुळे आता मतदारांनी बदल करण्याची वेळ आली आहे. घाबरले असल्याने दहा-दहा मंत्र्यांना प्रचार सभा घ्यावा लागतात. सभा म्हणजे 15 वर्षांच्या निष्क्रियेतवर पांघरुन घालण्याचा प्रयत्न आहे. जनता जोपर्यंत पाठिशी आहे. तोपर्यंत 50 मंत्री आले तरी घाबरणार नाही, असेही डॉ. कोल्हे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like