Bhosari : मधुमेह नियंत्रणात कुटुंबाचे सहकार्य आवश्यक – डॉ अनु गायकवाड

एमपीसी न्यूज- साखरेचे प्रमाण अचानक कमी झाल्यामुळे रुग्णाला मानसिक संतुलन बिघडते. मात्र कुटुंबाच्या सहकार्याने मधुमेहावर चांगले नियंत्रण ठेवता येते असे मत सुप्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉ अनु गायकवाड यांनी व्यक्त केले. जागतिक मधुमेह दिनानिमित्त बुधवारी (दि १४) भोसरी येथे कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृहात डॉ. गायकवाड डायबेटिस सेंटर व लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्ड यांच्या वतीने ‘डायबेटिस फेस्टिवल ‘ आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

फेस्टिवलचे उदघाटन ज्येष्ठ कविवर्य रामदास फुटाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, लायन्स क्लबचे प्रांतपाल रमेश शहा, उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे, राजेंद्र गुगले, लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्डचे अध्यक्ष सुदाम भोरे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. अनु गायकवाड यांनी मधुमेह व कौटुंबिक समस्या या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, जोडीदाराचे एकमेकांशी असलेले वैवाहिक संबंध, कुटुंबातील सदस्यांची भावनिक ओढाताण, चिडचिडेपणा, भांडणे याचा परिणाम मधुमेही रुग्णावर होतो. मधुमेह बळावल्यास कुटुंबाच्या अडचणीत वाढ होऊ शकते. मात्र कुटुंबाच्या सहकार्याने मधुमेहावर चांगले नियंत्रण ठेवता येते. साखरेचे प्रमाण अचानक कमी झाल्यामुळे रुग्णाला मानसिक संतुलन बिघडणे, जास्त राग येणे, गोष्टींचा विसर पडणे इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते. लग्नाच्या अगोदर मधुमेही रुग्णाने जोडीदारास मधुमेहाची कल्पना देणे गरजेचे आहे. ज्येष्ठ नागरिकांना औषधांचा विसर पडू शकतो. त्याची आठवण कुटुंबातील सदस्यांनी करून द्यावी. आहारात गोड पदार्थ टाळणे, तेलाचा वापर कमी करणे, मोड आलेली कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या व तंतुमय पदार्थ यांचा जास्त समावेश करणे, मैदानी व्यायाम ताण-तणाव नियंत्रण यांमुळे मधुमेह नियंत्रणात ठेवता व टाळता येऊ शकतो.

आमदार महेश लांडगे यांनी मधुमेह जनजागृतीसाठी तळमळीने झटणारे डॉक्टर म्हणून कौतुक करीत डॉ अनु गायकवाड यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी मधुमेही रुग्णांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यंदा सहाय्यक पोलीस आयुक्त राम मांडुरके यांना मधुमेह विजेता पुरस्कार तर हनुमंत माळी यांना मधुमेह उपविजेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मधुमेह जनजागृती व सामाजिक कार्यात मोलाचा वाटा असणाऱ्या पाच व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यामध्ये देविचंद अगरवाल, नितीन चिलवंत, मोहन गायकवाड, ब्रम्हकुमारी करुणाबहेन, डॉ. दीपाली कुलकर्णी यांचा समावेश होता.

मधुमेह मुक्ती व जनजागृतीसाठी आयोजित काव्य –जागर सोहळ्यात कवी भरत दौंडकर ,कवी राजेंद्र वाघ, कवी नारायण पुरी व कविवर्य रामदास फुटाणे यांनी मधुमेहावर खुमासदार काव्य रचना सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. 500 जणांनी या शिबिराचा लाभ घेतला.

सूत्रसंचालन दिगंबर ढोकले यांनी केले तर आभार डॉ शंकर गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ गायकवाड डायबेटिस सेंटरची संपूर्ण टीम, लायन्स क्लब’ भोजापूर गोल्ड, निमा पिं.चिं शाखा भोसरी तसेच आळंदी ,चऱ्होली डॉक्टर्स असोसिशिएन, संत निरंकारी मंडळ यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.