Bhosari : डॉ. अमोल कोल्हे यांची अशीही एक मोबाइल जाहीर सभा !

एमपीसी न्यूज- एकदा सभा घ्यायची हे ठरवले की कोणतीही अडचण येवो सभा घ्यायचीच ! या निश्चयाने राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी एक अनोखी प्रचार सभा घेतली. समोर श्रोते नसताना त्यांनी चक्क मोबाइलवरून चांदवड जवळ रस्त्याच्या कडेला उभे राहून चिंचवड आणि भोसरीच्या मतदारांना संबोधित केले. त्यांना असे का करावे लागले ?

गुरुवारी (दि. 17) पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या मतदारसंघात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या सभेसाठी डॉ. कोल्हे येण्याच्या तयारीत होते. मात्र पूर्वपरवानगी असतानाही ऐनवेळी एरंडोल मधून हेलिकॉप्टर उड्डाणासाठी त्यांना परवानगी नाकारण्यात आली. मग औरंगाबाद येथे जाऊन चार्टर्ड विमानाने पुणे येथे येण्यासाठी प्रयत्न केला. आश्चर्य म्हणजे प्राईम मिनिस्टर सर्किट असल्याचे कारण देत उड्डाणासाठी परवानगी सुद्धा नाकारण्यात आली.

नियोजित सभा अशा कारणामुळे रद्द कराव्या लागल्याची रुखरुख त्यांच्या मनात होती. पण डॉ. अमोल कोल्हे यांनी नवीन तंत्रज्ञानाची मदत घेऊन चक्क मोबाइल कॉल करून चिंचवड आणि भोसरीच्या संबोधित केले. एरंडोलवरून पुण्याला कारने येत असतानाच त्यांनी चांदवड- नाशिक रस्त्याच्या कडेला चांदवडजवळ गाडी उभी केली. संध्याकाळची वेळ होती. अंधार पडू लागलेला होता. कारच्या हेडलाईट ऑन केल्या आणि त्या प्रकाशात त्यांनी भोसरी- चिंचवड मतदारसंघात सुरु असलेल्या जाहीर सभेला मोबाइलवरून संबोधित केले.

भोसरी विधानसभेचे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार विलास लांडे यांना कपबशी समोरील बटण दाबून, चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना बॅटच्या चिन्हासमोरील बटण दाबून तसेच पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे त्यांनी आवाहन केले. समोर एकही श्रोता नसताना रस्त्याच्या कडेला झालेली ही जाहीर सभा आगळी वेगळीच म्हणावी लागेल.

“अडचणी जेवढ्या अधिक तेवढी संघर्षाला धार अधिक आणि संघर्ष जेवढा अधिक तेवढी यशाची झळाळी अधिक !” असे डॉ अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.