Bhosari : ‘भारूड हे लोकसंवादाचे मुक्त विद्यापीठ’

बंधुता साहित्य संमेलनात डॉ रामचंद्र देखणे यांनी उलगडले साहित्यातील लोकरंग

एमपीसी न्यूज- “आपल्या लोकसंस्कृतीतील भारूड हे समृद्ध दालन आहे. नृत्य, संगीत, नाट्य, विनोद असे सारे काही भारुडामध्ये असलेल्या भारुडामध्ये एकीकडे कीर्तन परंपरेचा आविष्कार आहे. तर, दुसरीकडे अभिजात रंगभूमीचा उगम हा भारुडामधून झाला आहे. भारुडाची गोडी अवीट, अक्षर आणि अविनाशी आहे. माझ्यासाठी भारूड हे लोकसंवादाचे मुक्त विद्यापीठ आहे, अशी भावना संतसाहित्य आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि भगवान महावीर शिक्षण संस्था यांच्या संयुक्तपणे भोसरी येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात आयोजिलेल्या एकविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन आणि प्रकाश पगारिया व्याख्यानमालेत लोकसाहित्य आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे बंधुता साहित्य संमेलनात कविवर्य उद्धव कानडे यांनी घेतलेल्या मुलाखती मध्ये व्यक्त झाले. यावेळी राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, परिषदेचे संस्थापक बंधुताचार्य प्रकाश रोकडे, संघटक डॉ. विजय ताम्हाणे, संयोजक प्राचार्य डॉ. अशोक शिंदे, सहसंयोजक महेंद्र भारती, प्राचार्य रामचंद्र जगताप, कवी चंद्रकांत वानखेडे, संगीता झिंजुरके, पत्रकार शिवाजीराव शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, “भारूड म्हणजे आध्यात्माचे निरूपण आहे. ज्ञानदेवांच्या आधीपासूनही लोककलावंत होता. वासुदेव, वाघ्या-मुरळी, गोंधळी, भराडी, पोतराज, कडकलक्ष्मी, भुत्या, पिंगळा असे वेगवेगळे लोककलावंत गावगाड्यातील लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करीत होते. आपल्या संतांनी प्रबंधरचना केली. पण, भक्तीचळवळ बांधण्यासाठी त्यांना सामान्यांची भाषा आणि लोकांशी संवाद साधण्याचे माध्यम हवे होते. हे माध्यम होण्याचे काम भारुडाने केले. या परंपरा लोप पावत चालल्या आहेत. त्यांचे जतन करण्याच्या उद्देशातून बहुरूपी भारूड ही संकल्पना जोपासने गरजेचे आहे. महारष्ट्राच्या लोककला, महाराष्ट्राच्या लोकभूमिका, लोकगीते, भारूडे, तमाशा,पोवाडे, कविता लोकसाहित्य या सर्वांच्या एकत्रिकरणातून महाराष्ट्राची लोकसंस्कृती उभी राहते.”

तत्पूर्वी झालेल्या सत्रात उद्धव कानडे यांनी मार्गदर्शन केले. माणसांचा शोध घेणारे साहित्य आण्णाभाऊ साठे यांनी निर्माण केले असल्याचे ते म्हणाले. दु:खातुन, वेदनेतुन आण्णाभाऊ साठे यांचे शब्द कागदावर उतरले आणि सामाजिक जीवनातील सामर्थ्यशाली साहित्य निर्माण झाले दीड दिवस शाळा शिकलेल्या आण्णाभाऊ साठे यांच्या कडे अनुभवाची श्रीमंत मोठी होती म्हणून 35 कादंबऱ्या आणि 22 कथासंग्रह, प्रवास वर्णन, पोवाडे असे थक्क करणारे लेखन त्यांनी केले. पण आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणून उपेक्षित राहिले.

यावेळी बंधुता ध्यासपिठावर संमेलानाध्यक्ष डॉ अशोक कुमार पगारिया ,प्रकाश रोकडे ,भगवान महावीर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विलासकुमार पगारिया, डॉ बजरंग कोरडे, डॉ विलास आढाव,उत्तम जाधव हे उपस्थित होते. डॉ बजरंग कोरडे, डॉ विलास आढाव यांना अण्णाभाऊ साठे पुरस्काराने, तर उत्तम जाधव यांना राजश्री शाहू महाराज न्याय हक्क पुरस्काराने गौरविण्यात आले. या सत्राचे निवेदन संगीता झिंजुरके यांनी केले तर आभार विलासकुमार पगारिया यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.