Bhosari : तीन वेगवेगळ्या घटनेत वाहनांची धडक बसून तिघांचा मृत्यू

निगडी, भोसरी एमआयडीसी, वाकड तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद

एमपीसी न्यूज – वाहनांची धडक बसून तीन घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेमध्ये दुचाकी घसरून एकाचा मृत्यू झाला. याबाबत निगडी, भोसरी एमआयडीसी, वाकड आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

नितीन देविदास कांबळे (वय 32) पिंपरी मधील डी वाय पाटील रुग्णालयात काम करतो. 23 जुलै रोजी दुपारी साडेपाचच्या सुमारास कामावरून सुटल्यानंतर तो त्याच्या मित्रासोबत दुचाकीवरून (एम एच 24 / ए क्यू 5325) टेल्को रोडने जात होता. केएसबी चौकाकडून साने चौकाकडे जात असताना मागच्या बाजूने भरधाव वेगात आलेल्या एका वाहनाने नितीनच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये नितीनला गंभीर तर त्याच्या मागे बसलेल्या मित्राला किरकोळ दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र नितीनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नितीनचा भाऊ नागेश देविदास कांबळे (वय 23) याने याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

दुसऱ्या घटनेत तळेगाव दाभाडे येथे जुना पुणे-मुंबई महामार्गावरून जात असताना हॉटेल मावळ तडका येथे एका मोपेड दुचाकीला (एम एच 14 / सी व्ही 8744) अज्ञात वाहनाने मागच्या बाजूने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून जात असलेल्या जुगल बजाज (वय 45, रा. तळेगाव स्टेशन) यांचा गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 1) सकाळी सव्वाआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी गोरक्षनाथ निवृत्ती सोनवणे (वय 47, रा. तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली.

वाकड येथे पंडित पेट्रोल पंपासमोरून राजश्री विजय धेंडे (वय 51, रा. हिंजवडी रोड, ताथवडे) या रस्ता ओलांडत होत्या. रस्ता ओलांडत असताना एका मोटारसायकलने (एम एच 48 / ए बी 5817) त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये राजश्री गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात 27 जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडला. याप्रकरणी गौरव विजय धेंडे (वय 30) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

आणखी एका घटनेमध्ये दुचाकी घसरून पडल्याने एकाच मृत्यू झाला. ही घटना 25 जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास यमुनानगर पोलीस चौकीजवळ घडली. याप्रकरणी पोलीस हवालदार नागेंद्र बनसोडे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अंकुश त्यांच्या मोटारसायकलवरून जात होते. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून भरधाव वेगात चालवल्यामुळे त्यांची दुचाकी घसरली. यात अंकुश गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.