Bhosari : कवितेमधुन आपल्या आत्म्याचा आतला आवाज दर्शविता आला पाहिजे- रामदास फुटाणे

राज्यस्तरीय गदिमा काव्य स्पर्धा 2018 स्पर्धेचे पारितोषिक वितरण

एमपीसी न्यूज- कविता कशी असावी आणि नसावी हे कोणीही कोणाला शिकवू नये. तुमच्या आत्म्यातून जी येते ती कविता असते. त्यामुळे सुचेल तशी कविता लिहीत रहा. कवितेमधुन आपला आत्म्याचा, वर्गाचा आणि समाजाचा आतला आवाज दर्शविता आला पाहिजे. असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी भोसरी येथे व्यक्त केले. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद , महाराष्ट्र साहित्य परिषद, लायन्स क्लब भोजापूर गोल्ड यांच्या वतीने आयोजित केलेला राज्यस्तरीय गदिमा काव्य स्पर्धा 2018 या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात नवोदित कवींना मार्गदर्शन करताना बोलत होते.

हा कार्यक्रम भोसरीतील महात्मा फुले विद्यालयातील सावित्रीबाई फुले सभागृहात झाला. यावेळी गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर, उद्धव कानडे, लायन्स क्लब भोजापूर गोल्डचे अध्यक्ष सुदाम भोरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुरलीधर साठे महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे पुरुषोत्तम सदाफुले, नीळकंठ लोंढे, भास्कर म्हाळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

रामदास फुटाणे नवोदित कवींना मार्गदर्शन करताना म्हणाले, “कविता एकसारख्या असू नयेत. अनेक कवितांचा अभ्यास करा. इतरांच्या कवितांचे वाचन करून तुमची वैचारिक बैठक निश्चित झाल्यानंतरच कविता लिहा. कवितेमधुन आपला आत्म्याचा, वर्गाचा आणि समाजाचा आतला आवाज दर्शविता आला पाहिजे असेही फुटाणे म्हणाले. गदिमा काव्यस्पर्धेत पारितोषिक मिळाले म्हणून कविता लिहायचे थांबू नका. आपल्या पात्रतेपेक्षा जास्त प्रसिध्दी मिळाली की माणस खुजी होतात .प्रसिध्दी आपल्या खांद्याएवढीच हवी आहे. प्रसिध्दी आणि कीर्ती वेगवेगळी आहे. स्वतः बडबड करतो ती प्रसिध्दी आणि इतर करतात ती कीर्ती असते”

सुमित्र माडगूळकर म्हणाले की, माझा जन्म माडगूळकर कुटुंबात झाला असला तरी खरे वारसदार आपणच अहात असे सांगत आजपर्यत गदिमांचे स्मारक होत नसल्याबद्दलची खंत व्यक्त केली. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरातील नाट्यगृहाचे काम गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षात पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली .

गदिमा राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत महाराष्ट्रातील सुमारे 500 कवींनी सहभाग नोंदवला. त्यातील 100 कवींना काव्यवाचनासाठी निमंत्रित करण्यात आले. परीक्षक म्हणून ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक माधव राजगुरू, रानकवी तुकाराम धांडे, पत्रकार भालचंद्र मगदूम यांनी काम पाहिले प्रास्ताविक पुरुषोत्तम सदाफुले यांनी तर सूत्रसंचालन प्रा .दिगंबर ढोकले यांनी केले. आभार मुकुंद आवटे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन मुकुंद आवटे, अरुण इंगळे, रोहित खर्गे, नागेश वसतकर, श्रीकृष्ण अत्तरकर, राजेंद्र वाघ, जयवंत भोसले, बाजीराव सातपुते यांनी केले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-

प्रथम क्रमांक- डॉ. स्वप्नील चौधरी (दहा हजार रुपये/ व स्मृती चिन्ह),
व्दितीय क्रमांक- अनंत राउत (सात हजार रुपये / स्मृती चिन्ह),
तृतीय क्रमांक – सुमित गुणवंत (पाच हजार रुपये/ व स्मृती चिन्ह),
चतुर्थ क्रमांक – शितल गाजरे (तीन हजार रुपये/ व स्मृती चिन्ह),
पाचवा क्रमांक- निकिता बहिरट (दोन हजार रुपये/ व स्मृती चिन्ह)

उत्तेजनार्थ – कविता काळे, अंकुश आरेकर, अविनाश भामरे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.