Bhosari : भोसरीकरांनी दिला लाडक्या बाप्पाला निरोप

एमपीसी न्यूज – गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… असा जयघोष करीत आणि भंडा-याची उधळण करत भोसरीकरांनी आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला. ढोल-ताशांचा निनाद.. फटक्यांची आतषबाजी अशा जल्लोषात आणि तितक्याच भावपूर्ण वातावरणात पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी गणपती बाप्पाला आर्जव करण्यात आले.

भोसरीतील सार्वजनिक गणेश मंडळांची अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची परंपरा आहे. ही परंपरा कायम राखत आज (शनिवारी) गणेशाचे विर्सजन करण्यात येत आहे. दुपारी दोन वाजल्यापासून सुरू झालेली मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

दुपारी तीन वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. सायंकाळी सहानंतर गणेश मंडळांच्या मिरवणुका विसर्जन मार्गावर येऊ लागल्या. त्यामुळे रस्ते गर्दीने फुलून गेले. भोसरीतील मानाचा गणपती असणा-या लांडगे लिंबाची तालीम मंडळाने ‘पुष्परथ’ साकारला होता.  लांडेवाडीतील नव महाराष्ट्र तरुण मंडळाने ‘मयूर रथ’  साकारला होता. छत्रपती शिवाजी मित्र मंडळाने ‘अश्वरथ’ साकारला होता. तर, फुगे-माने तालीम मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसलेला देखावा केला होता.

लांडगे ब्रदर्स अँड फ्रेंड सर्कल मित्र मंडळाने ‘नागरथ’ सादर केला होता. पठारे लांडगे तालीम व्यायाम मंडळाने आकर्षक असा ‘पुष्परथ’ साकारला होता. समस्त गव्हाणे तालीम मंडळाने ज्ञानोबा-तुकोबांचा देखावा सादर केला होता. नयनरम्य विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती.

महापालिकेच्या वतीने भोसरीतील विहिरीजवळ, तसेच मोशी येथे विसर्जन घाटावर जीवरक्षक तैनात करण्यात आले होते. काही मंडळांनी डीजेचा दणदणाट केला. आवाजाची पातळी तपासून पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. तसेच महापालिकेने भोसरीतील पीएमटी चौकात मिरवणूक काढलेल्या गणेश मंडळांच्या स्वागतासाठी कक्ष उभारला आहे. महापालिकेचे पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या हस्ते सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन सत्कार करत आहेत. विसर्जन मिरवणूक मार्गावार पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.