Bhosari : जागेच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; परस्पर विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – जागेच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. त्यात एकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना कासारवाडी रेल्वे स्टेशनजवळ नर्मदेश्वर महादेव मंदिराशेजारी सोमवारी (दि. 16) सायंकाळी घडली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अम्रितसिंग लालसिंग गिल (वय 36, रा. शगुन चौक पिंपरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जाॅन डॉमनिक फर्नांडिस (वय 35), मायकल डॉमनिक फर्नांडिस (वय 32), रोजी डॉमनिक फर्नांडिस (वय 30, सर्व रा. कासारवाडी) आणि अन्य चार जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गिल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास आरोपींनी गिल यांना त्यांची कासारवाडी येथील जागा खाली कर, नाहीतर तुला आज संपवतो. अशी धमकी दिली. गिल यांना शिवीगाळ करून आरडाओरडा करत परिसरात दहशत निर्माण केली. आरोपींनी गिल यांना तलवारीने मारण्याचा प्रयत्न केला. तसेच अन्य आरोपींनी गिल यांना दगड, विटा, लोखंडी स्टूल याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गिल यांची बहीण भांडण सोडवण्यासाठी आली असतात आरोपींनी त्यांनाही मारहाण करत त्यांचा विनयभंग केला.

याच्या परस्पर विरोधात जॉन डॉमनिक फर्नांडिस (वय 28, रा. संत तुकाराम नगर पिंपरी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अम्रित लालसिंग गिल, त्याची बहीण व अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जॉन याने दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी सायंकाळी जॉन त्यांच्या नातेवाईकांसोबत कासारवाडी रेल्वे स्टेशन जवळील एका टपरीवर चहा पीत होते. त्यावेळी आरोपी तिथे आला, ‘क्या रे तेरा हमेशा का नाटक है, मुझे मालूम है, यह जगह मेरी है’, असे म्हणत आरोपीने दमदाटी करून तलवारीने जॉन यांच्यावर हल्ला केला. यामध्ये जॉन यांच्या हाताला दुखापत झाली. आरोपींनी जॉन यांचा भाऊ आणि बहिणीवर देखील हल्ला केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही गुन्ह्यांचा तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.