Bhosari : गुडलक चौकात वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालून टाकला वर्दीवर हात; एकास अटक

एमपीसी न्यूज – भोसरी येथील गुडलक चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसासोबत हुज्जत घालून एकाने पोलिसाच्या वर्दीवर हात टाकून नेमप्लेट तोडली. ही घटना सोमवारी (दि. 3) रात्री आठ वाजता घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

दादाराव गोपाळ माने (वय 35, रा. दत्तनगर, दिघी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई दिनकर महाडिक यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस शिपाई महाडिक हे भोसरी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. सोमवारी रात्री ते भोसरी येथील गुडलक चौकात कर्तव्यावर हजर होते. त्यावेळी आरोपी तिथे आला. ‘चौकामध्ये झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नाहीत. तुम्ही पोलीस काय फक्त गाड्या अडवण्याचे काम करता का’ असे आरोपीने म्हटले.

चौकात झेब्रा क्रॉसिंग असून तू त्यावरून निघून जा, असे महाडिक यांनी आरोपीला सांगितले. त्याचा आरोपीला राग आल्याने ‘चौकातील सर्व सिग्नल बंद करा मला जाऊ द्या, असे म्हणून फिर्यादींसोबत त्याने अरेरावी केली. फिर्यादी यांना धक्काबुक्की करून फिर्यादी यांच्या शर्टाची नेमप्लेट तोडून त्यांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.