Bhosari News : ‘हिंदू’ पुन्हा वादात; भालचंद्र नेमाडे यांच्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – भालचंद्र नेमाडे यांची ‘हिंदू – जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरी पुन्हा एकदा वादात अडकली आहे. अनेक कारणांमुळे अनेकदा चर्चेत असलेल्या ‘हिंदू – जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीतील काही मजकुरावर आक्षेप घेतल्याने ती पुन्हा वादात अडकली आहे.

लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात पिंपरी-चिंचवड मधील भोसरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अॅड. रमेश खेमू राठोड (वय 35, रा. शांती नगर, भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भालचंद्र वनाजी नेमाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू – जगण्याची समृद्ध अडगळ’ या पुस्तकात नेमाडे यांनी लमाण समाजाच्या महिलांबाबत आक्षेपार्ह लिखाण केले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘लमाण समाजाच्या बायका पाण्यामध्ये माश्यासारखे नग्न पाहतात. लमाण समाजाच्या महिला हडप्पा काळापासून वेश्या व्यवसाय करतात.’ यामुळे जाती व समाज यांच्यात द्वेषाची भावना निर्माण झाली आहे.

अॅड. राठोड ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना म्हणाले, “भालचंद्र नेमाडे यांनी पुस्तकात आक्षेपार्ह लिखाण केले आहे. संबंधित प्रकाशक आणि लेखक यांनी ‘हिंदू – जगण्याची समृद्ध अडगळ’ हे पुस्तक माघारी घ्यावे. तसेच लमाण समाजाची माफी मागावी.”

भालचंद्र नेमाडे यांची ‘हिंदू – जगण्याची समृद्ध अडगळ’ ही कादंबरी सन 2010 साली प्रकाशित झाली. दरम्यान या कादंबरीबाबत अनेक साधक-बाधक चर्चा झाल्या. त्यावर सडेतोडपणे नेमाडे यांनीही भूमिका बजावली. मात्र, हिंदू पुन्हा वादात अडकली असून कादंबरी पूर्णपणे माघारी घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.