Bhosari : आर्थिक विवंचनेतून पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

एमपीसी न्यूज – आर्थिक विवंचनेतून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज, मंगळवारी (दि. 14) भोसरी येथील शास्त्री चौक परिसरात उघडकीस आला आहे.

प्रियंका देशमुख (रा. शास्त्री चौक, भोसरी) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर, निलेश देशमुख असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश देशमुख आणि प्रियंका देशमुख यांचा प्रेमविवाह झाला होता. निलेश हा इंदूर येथील असून प्रियंका अमरावतीची आहे. विवाहानंतर देशमुख दांपत्य पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आले. आरोपी पती निलेश आणि मयत पत्नी प्रियंका यांना सात वर्षाची मुलगी आहे.

सोमवारी सात वर्षीय मुलीला प्रियंकाने आपल्या मैत्रिणीकडे पाठवले होते. रात्री नऊच्या सुमारास मुलीला घेऊन जाण्यासाठी मैत्रिणीने प्रियंकाला फोन केला. मात्र, प्रियंकाने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सोमवारी रात्री मैत्रिणीने प्रियंकाच्या मुलीला आपल्या घरी ठेवून घेतले.

मंगळवारी सकाळी पुन्हा मैत्रिणीने प्रियंकाला फोन केला. परंतु, तरीही प्रियंकाने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मैत्रीण प्रियंकाच्या भोसरी येथील घरी पोहोचली. घराचा दरवाजा ठोठावला. पण, आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. काही वेळ दरवाजा ठोठावल्यानंतर मैत्रिणीने पोलिसांना बोलावले. पोलिसांच्या मदतीने दरवाजा तोडला असता प्रियंका निपचित पडलेल्या आणि निलेश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. निलेश याने पत्नी प्रियंकाचा खून करून स्वतः राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. निलेश याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2
You might also like