Bhosari : शास्तीकर लादून ज्यांनी जखमा केल्या, त्यांनीच डोळे पुसण्याचे अवसान आणू नये – महेश लांडगे

शास्तीकराचा प्रश्न सोडविल्याशिवाय शांत बसणार नाही

लघुउद्योजक, नागरिकांनी घेतली आमदार महेश लांडगे यांची भेट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामावरील शास्तीकर संपुर्णपणे माफ करण्यासाठी आमचा लढा सुरु आहे. राज्य सरकारने 1000 चौरस फुटाच्या बांधकामांचा शास्तीकर माफ केला आहे. 1001 पुढील अवैध बांधकामांचा सरसकट शास्तीकर माफ करण्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. शास्तीकराचा प्रश्न सोडविल्याशिवाय मी शांत बसणार नाही. शास्तीकराची लढाई अर्ध्यावर सोडणार नाही, असे आश्वासन आमदार महेश लांडगे यांनी बाधित नागरिकांना दिले. तसेच ज्यांनी शास्तीकर लावून जखमा केल्या त्यांनीच आता डोळे पुसण्याचे अवसान आणू नये, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगाविला.

शास्तीकराची अमंलबजावणी करु नये.1001 चौरस फुटापुढील निवासी मालमत्ताधारकांना नोटीसा पाठवू नयेत. अदा केलेल्या नोटीसांना तत्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी आयुक्तांना केली होती. त्यानंतर आज (मंगळवारी)लघुउद्योजग संघटनेचे पदाधिकारी, उद्योजक, बाधित नागरिकांनी आमदार लांडगे यांची भेट घेतली. यावेळी शास्तीकराची लढाई अर्ध्यावर सोडणार नसल्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले.

आमदार महेश लांडगे म्हणाले, ” राज्य सरकारने 1000 चौरस फुटाच्या अवैध बांधकामांचा शास्तीकर माफ केला आहे. त्यापुढील अवैध बांधकामांचा देखील शास्तीकर माफ करण्याचा निर्णय घेण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. शास्तीकर माफीचा निर्णय महापालिका स्तरावर घेण्यात यावा. महापालिकेला त्याचे अधिकार देण्यात यावेत, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे. शास्तीकर सरसकट माफ करण्याचा निर्णय महासभेने घ्यावा. तात्पुरत्या स्वरुपात शास्तीकर वगळून मूळ कर स्वीकारण्यात यावा. याबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहे”

“कोणतेही बंधन न ठेवता अवैध बांधकामांचा निवासी, वाणिज्य, औद्योगिक शास्तीकर सरसकट माफ होण्यासाठी माझा लढा सुरु आहे. शास्तीकराची लढाई अर्ध्यावर सोडणार नाही. शास्तीकराचा प्रश्न सोडविल्याशिवाय शांत बसणार नाही. तसेच ज्यांच्या काळात शास्तीकर लावला. ज्यांनी जखमा केल्या त्यांनीच डोळे पुसण्याचे अवसान आणू नये” असा टोलाही आमदार लांडगे यांनी विरोधकांना लगाविला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.