Bhosari : पत्नीच्या मोबाईलवरून मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना अश्लील मेसेज; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पत्नीच्या मोबाईल फोनवरून पत्नीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांच्या मित्र, मैत्रिणी, सहकारी व नातेवाईकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून अश्लील मेसेज व फोटो पाठवून पत्नीची बदनामी केली. याप्रकरणी पती, सासू आणि सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 33 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 34 वर्षीय पती, सासू आणि सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या माहेरच्या लोकांनी त्यांच्या लग्नात हुंडा दिला नाही, यावरून आरोपींनी संगनमत करून फिर्यादी महिलेला अपमानास्पद वागणूक देऊन त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. आरोपींनी फिर्यादी महिलेचा मोबाईल फोन जबरदस्तीने धाक दाखवून घेतला. त्यातील सोशल मीडिया अकाउंटवरून तिच्या मित्र, मैत्रिणी, सहकारी व नातेवाईकांना मेसेज पाठवले.

फिर्यादी महिलेच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार केले. त्यावरून फिर्यादीच्या मित्र, मैत्रिणी, सहकारी व नातेवाईकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर फिर्यादींविषयी अश्लील व क्रॉप केलेला फोटो पोस्ट करून त्यांची बदनामी केली.

आरोपी पतीने त्याच्या मोबाईलवरून फिर्यादींच्या मोबाईलवर सोशल मीडियावरून अश्लील मेसेज पाठवले. तसेच शिवीगाळ करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.