Bhosari News : …तरच देशाची प्रगती – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज  – इंद्रायणी थडीचा कार्यक्रम मातृशक्तीला समर्पित केला आहे. महिलांना अर्थव्यवस्था, सामाजिक प्रवाहात समावून घेतल्यास देशाची प्रगती होते. (Bhosari News) महिलांना या सर्व व्यवस्थेत सामावून घ्यावे लागेल, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.  

शिवांजली संखी मंचच्या अध्यक्षा पुजा लांडगे यांच्या पुढाकाराने आयोजित इंद्रायणी थडी- 2023 हा महोत्सवाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते आज (बुधवारी) झाले. आजपासून 29 जानेवारी 2023 दरम्यान भोसरी येथील गावजत्रा मैदानात जत्रा सुरु असणार आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार महेश लांडगे, राहुल कुल, उमा खापरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, अमर साबळे, शरद सोनवणे, शंकर जगताप, सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, कालीचरण महाराज आदी उपस्थित होते.

Chinchwad Bye Election : उमेदवारीबाबत अद्याप काहीच ठरले नाही – शंकर जगताप

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,  महिला बचत गटांची चळवळ जवळून बघितली आहे. मी मुख्यमंत्री असतानाच्या पाच वर्षात 3 लाखांहून 57 लाख महिलांना बचतगटाशी जोडले. गटाला दिलेले कर्ज 100 टक्के परत येते. महिलांना पैशांचे महत्व माहिती असते. पुरुषांच्या हाती पैसे आले. (Bhosari News) तर, ते काही करतील याचा भरवसा नाही. मॅनेजमेंटचा गुण महिलांमध्ये असतो. महिलांना नियोजन माहिती असते. जत्रेच्या माध्यमातून महिला बचतगटांना व्यवसाय मिळेल.

पिंपरी-चिंचवड शहर असले. तरी, गावे समाविष्ट झाल्याने शहर झाले. पण, आजही गावातील मातीचा सुगंध शहरवासीयांना अनुभवला मिळतो. तो सुगंध जपण्याचे काम जत्रेच्या माध्यमातून होत आहे, असेही फडणवीस म्हणाले.

इंद्रायणी थडी कार्यक्रम मातृशक्तीला समर्पित करण्यात आल्याबद्दल आमदार लांडगे यांचे कौतुक करून उपमुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले, जगाच्या पाठीवर प्रगत देशांचा विकास मातृशक्तीच्या क्षमता ओळखल्याने झाला. त्यांनी या मानव संसाधनाचा उपयोग देशाच्या संचलनात करत देशाच्या अर्थव्यवस्थेत सामावून घेतले. त्यामुळे त्यांच्या विकासाचा वेग दुपटीने-तिपटीने वाढला आणि ते सर्व देश प्रगत झाले. त्यामुळे आपल्यालाही महिलांना या सर्व व्यवस्थेत सामावून घ्यावे लागेल.

प्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी बेटी बचाव, बेटी पढाव च्या माध्यमातून महिलांच्या विकासाला चालना दिली. स्टार्टअपच्या माध्यमातून विकास होत असून त्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात 50 टक्के महिला आहेत. त्यांनी कर्ज मिळवून अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवसाय उभा केला आहे. या जत्रेच्या माध्यमातून एक हजार महिला बचत गटांना स्टॉल्स देणे महत्वाची बाब आहे.

महिला बचत गट चळवळीमुळे अनेक महिलांना बचत गटाशी जोडून त्यांना विविध काम देण्यात आले आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ किंवा इतर शासकीय योजनांमध्ये महिला बचत गटांना दिलेले कर्ज शंभर टक्के परत येते. कारण महिलांना पैशाचे महत्व माहित आहे, त्या पैशाचा योग्य उपयोग करतात. व्यवस्थापनाचा उपजत गुण त्यांच्यात असतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना त्या पैशाचे योग्य नियोजन करतात. त्यामुळे अशा महिलांना बचत गटाशी जोडले तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

इंद्रायणी थडी जत्रेमुळे महिलांना रोजगार वाढविण्यासाठी संधी मिळण्यासोबत व्यवसाय वाढविण्यासाठी पैसा मिळेल, प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केल.

इंद्रायणी थडी जत्रेच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचे संवर्धन

अनेक गावे मिळून पिंपरी-चिंचवड शहर झाले आहे. जत्रेच्या माध्यमातून गावातील मातीचा सुगंध इथल्या नागरिकांमध्ये पहायला मिळतो, गावांमध्ये पहायला मिळतो. तो मातीचा सुगंध जीवंत ठेवण्याचे काम जत्रेच्या माध्यमातून होत आहे. बचत गटातील महिलांना प्रोत्साहन देण्यासोबत ग्रामीण संस्कृती आणि आपल्या पारंपरिक संस्कृती आणि कलांचे संवर्धन करण्याचे कार्य होत आहे. अतिशय सुंदर ग्रामीण संस्कृती जत्रेत उभारण्यात आली आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी आयोजनाचे कौतुक करत जत्रेला शुभेच्छा दिल्या. परिसरातील नागरिकांना आनंद देणारी जत्रा असल्याचे ते म्हणाले.

पालकमंत्री पाटील म्हणाले, इंद्रायणी थडी जत्रेमुळे 20 हजार महिलांना रोजगार मिळाला आहे. गावातील संस्कृती टिकावी म्हणून त्याचे प्रदर्शन जत्रेत करण्यात आले आहे. बचत गटातील महिलांना बाजारपेठ मिळाल्याशिवाय प्रोत्साहन मिळणार नाही. या जत्रेमुळे असे प्रोत्साहन देण्याचे कार्य झाले आहे.

आमदार लांडगे म्हणाले, दोन वर्षानंतर या जत्रेचे आयोजन होत आहे. जत्रेच्या माध्यमातून 20 हजार महिलांना व्यवसायाची संधी मिळते आहे. सुमारे हजार बचत गटांना यानिमित्ताने बाजार उपलब्ध झाला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते इंद्रायणी थडी जत्रेतील ग्राम संस्कृती प्रदर्शन केंद्राचे उद्घाटनही करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.