Bhosari : गावजत्रा मैदानावर 8 ते 11 फेब्रुवारी दरम्यान भरणार इंद्रायणी थडी

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात मोठा ग्रामीण महोत्सव

एमपीसी न्यूज- भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीशी अंतर्मुख करायला लावणारा ‘इंद्रायणी थडी’ हा ग्रामीण महोत्सव भरविण्यात येत आहे. हा महोत्सव भोसरी मधील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारी गावजत्रा मैदानावर 8 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. महोत्सवाचे आयोजन महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि शिवांजली सखी मंच पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

इंद्रायणी थडीचे उदघाटन महिला व बाल कल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अमृता फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, भाजपच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, सभागृह नेते एकनाथ पवार आदी उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती आमदार महेश लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षा स्वीनल म्हेत्रे, शिक्षण मंडळ अध्यक्षा सोनाली गव्हाणे आदी उपस्थित होत्या.

ग्रामीण संस्कृतीचा शहरांशी साधलेला एक संवाद सोहळा म्हणून ‘इंद्रायणी थडी’ हा महोत्सव सुरु करण्यात आला आहे. शहरी धकाधकीचे जीवन आणि फ्लॅट संस्कृती यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती काहीशी लोप पावत चालली आहे. भोसरी परिसराची ओळख कला, क्रीडा आणि शेती यांच्याशी निगडित आहे. त्यामुळे हा ग्रामीण संस्कृतीचा बाज राखणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यातूनच हा महोत्सव उदयास आला आहे. इंद्रायणी थडी महोत्सवात विविध स्टॉल लावण्यात येणार आहेत.

इंद्रायणी थडी मध्ये होम मिनिस्टर, महिलांचे पारंपरिक खेळ, बालजत्रा, साहसी खेळ, गावरान खाद्य महोत्सव, महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा दर्शविणारे कार्यक्रम, महिलांसाठी जॉब फेअर, महिला आरोग्य शिबीर यांसारखे विविध स्टॉल असणार आहेत. महिला सक्षमीकरण आणि विकासाला या माध्यमातून चालना देण्यात येणार आहे. विविध कार्यक्रमांमध्ये विशेष सहभाग आणि लकी ड्रॉ च्या माध्यमातून दररोज एक हजार वेगवेगेळी बक्षिसे देण्यात येणार आहेत. महिला बचत गटांचे दर्जेदार उत्पादन, हस्तकला वस्तू , महाराष्ट्राचे अस्सल खाद्य पदार्थ आणि ग्रामीण संस्कृतीचं दर्शन या सर्व गोष्टींचा एकाच छताखाली आनंद घेण्याची संधी पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार आहे.

भोसरी, पिंपरी-चिंचवड शहरासह पुणे आणि परिसरातील बचत गटांना इंद्रायणी थडीमध्ये सहभाग घेता येणार आहे. महिला बचत गटांसाठी निशुल्क स्टॉल देण्यात येणार आहे. आवश्यक कागदपत्रांसह आमदार महेश लांडगे यांच्या संपर्क कार्यालयातून स्टॉलसाठी नोंदणी करता येणार आहे. स्टॉल नोंदणी साठी संदीप ठाणेकर (7720043860) यांच्या संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. महिला बचत गटांनी तयार केलेले पदार्थ आणि वस्तू इंद्रायणी थडीमध्ये विकता येणार आहेत. बाजारातील वस्तू घेऊन विक्री करता येणार नाही. त्याबाबतची योग्य ती खबरदारी आयोजकांकडून घेण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामध्ये लोकसहभाग महत्वाचा आहे. त्याची जनजागृती करण्यासाठी इंद्रायणी थडी जत्रेत जनजागृती करण्यात येणार आहे. प्रकल्पाची संपूर्ण माहिती देत नागरिकांच्या सहभागाचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. आयोजकांचे स्वयंसेवक, खाजगी सुरक्षा रक्षक आणि पोलीस यांच्या माध्यमातून जत्रेत सुव्यवस्था पाळली जाणार असल्याचेही आमदार लांडगे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like