BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : महिला सक्षमीकरणासाठी पुढचे पाऊल ठरलेली अभूतपूर्व आणि अतुलनीय अशी इंद्रायणी थडी

आमदार महेशदादा लांडगे यांच्या उत्तम नियोजनाचा वस्तुपाठ ठरलेली इंद्रायणी थडी

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश किसनराव लांडगे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडणारा आणि आपल्याला बालपणातील गावाशी पुन्हा जोडून अंतर्मुख करायला लावणारा ‘इंद्रायणी थडी’ हा ग्रामीण महोत्सव भरविण्यात आला होता. शिवांजली सखी महिला मंचाच्या अध्यक्षा पूजा महेश लांडगे यांचा व त्यांच्या महिला सहका-यांचा देखील सक्रिय सहभाग असलेला हा महोत्सव भोसरीमधील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर 8 ते 11 फेब्रुवारी दरम्यान नागरिकांच्या अलोट गर्दीत, त्यांनी तेथे असलेल्या विविध उपक्रमांचा मनसोक्त आनंद लुटल्यामुळे न भूतो न भविष्यती अशाप्रकारे यशस्वी झाला. यंदा हे या उपक्रमाचे पहिलेच वर्ष होते. पण यापूर्वी झालेल्या कोणत्याही जत्रेत अशा प्रकारचा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अनुभवायला मिळाला नव्हता हे या जत्रेचे विशेष म्हणायला हवे. या चार दिवसांच्या कालावधीत एकूण पाच लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी या इंद्रायणी थडीला भेट दिली. आणि येथील विविध प्रकारच्या स्टॉल्सवर एकूण सुमारे साडेचार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली. या इंद्रायणी थडीला भेट दिलेल्या प्रत्येकानेच येथे असलेल्या प्रत्येक उपक्रमाचा मनमुराद लाभ घेतला. खाद्यजत्रेत विविध पदार्थांवर मनसोक्त ताव मारला.

या जत्रेत आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून चार घटका विरंगुळा मिळावा म्हणून अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांच्या आवडींचा यात विचार करण्यात आला होता हे याचे विशेष. लहानांसाठी मोफत बालजत्रा, साहसी खेळ, तरुणाईत साहस निर्माण करण्यासाठी शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, नृत्यस्पर्धा, मध्यमवयीनांना आपल्या गावाची आठवण करुन देण्यासाठी ग्रामसंस्कृती, महिलांसाठी खास भजनी स्पर्धा, आजच्या मॉडर्न स्त्रीला उभारी देण्यासाठी मिसेस इंद्रायणी ही सौंदर्यस्पर्धा, सर्वांसाठी आरोग्य तपासणी, संस्कृतीची आठवण करुन देणारे सांस्कृतिक कार्यक्रम, स्वत:साठी आणि कुटुंबियांसाठी आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी खास स्टॉल्स आणि सर्वात महत्वाचे म्हणजे येथून परत घरी गेल्यावर घरच्या गृहिणीला स्वयंपाक करायला लागू नये म्हणून विविध पदार्थांचा समावेश असलेल्या खास खाद्यजत्रेची सोय असे परिपूर्ण नियोजन या जत्रेच्या माध्यमातून करण्यात आले होते.

या इंद्रायणी थडीमध्ये एकूण 580 स्टॉल्स होते. त्यापैकी शहरातील 345 बचतगटांचे मिळून कपडे, दागिने आणि इतर वस्तूंचे स्टॉल्स होते. तसेच शासकीय यंत्रणांचे एकूण 20 स्टॉल्स होते. त्यामुळे या माध्यमातून या महिला बचतगटांना एक हक्काचे व मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले होते. यात जी साडेचार कोटींची उलाढाल झाली त्यावरुनच या जत्रेची यशस्विता लक्षात येते.

भोसरी येथे भरवण्यात आलेल्या इंद्रायणी थडी या महोत्सवात जुन्या गावांचे दर्शन घडवणारी ग्रामसंस्कृती तंतोतंत साकारण्यात आली होती. त्यात उभारण्यात आलेल्या पाटलाच्या वाड्यासमोर आणि ख-या बैलजोडीची हुबेहूब आठवण करुन देणा-या दमदार बैलांसमवेत फोटो काढण्यात लहानांपासून थोरांपर्यंत सगळे नागरिक रमले होते.

ग्रामसंस्कृतीचे यथार्थ दर्शन घडवणारी गावजत्रा लहानथोरांचे आकर्षण ठरली. यात जुन्या काळातील गावाचे रुप साकारण्यात आले असून जुन्या गढींमध्ये असणा-या नगारखान्याची आठवण करुन देणारे प्रवेशद्वार बघताच क्षणी जुन्या काळात घेऊन गेले. त्यानंतर आत गेल्यावर तिथे गावगाडा साकारताना शाळा, , बैलगाडी, मधमाशीपालन केंद्र, पाटलाचा वाडा, भव्य आणि नक्षीदार देऊळ, बारा बलुतेदारांचे कारखाने हे सर्व बारकाईने मांडण्यात आले होते. त्याचबरोबर शेतक-याचा खरा सखा असलेली खरीखुरी आणि नकली बैलजोडी देखील ठेवण्यात आली होती. या बैलांशेजारी, त्यांच्या पाठीवर बसून फोटो घेण्यात लहानांसोबत तरुणाई आणि लहानग्यांचे वडीलसुद्धा रमून गेले. तशीच येथे खरी बैलगाडीदेखील होती. त्यात बैलगाडीत बसून गावात गेल्याचा आनंद मिळवण्यात देखील लहानथोर गुंगले.

ग्रामीण जीवनाचे समग्र दर्शन येथे घडवण्यात येत असून याच साखळीचा आणखी एक दुवा म्हणून येथे शिवकालीन शस्त्रे, किल्ल्यांच्या छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले होते. या दालनाच्या प्रवेशद्वारासमोरच छत्रपती शिवरायांचा भव्य आणि प्रेरणादायी पुतळा साकारला होता. येथे संपूर्ण भारतातील सुमारे 120 किल्ल्यांची छायाचित्रे मांडण्यात आली होती. त्यात दक्षिणेतील, महाराष्ट्रातील किल्ल्यांची विविध दुर्गप्रेमींनी काढलेली सुमारे 150 निवडक छायाचित्रे लावण्यात आली होती. यात महाराष्ट्रातील किल्ले जिल्हावार चित्रीत केलेले होते. तसेच डोंगरी किल्ले आणि सागरी किल्ले अशी या छायाचित्रांची विभागणी केलेली होती. तसेच येथील एक विशेष भाग म्हणजे सध्या पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये असलेले पण मराठ्यांच्या फौजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर जिंकलेल्या किल्ले अटक व किल्ले जमरुडच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती येथे मांडण्यात आल्या होत्या. थोरल्या शाहू महाराजांच्या निधनानंतर निर्नायकी झालेल्या मराठा साम्राज्यातील शूर सरदारांची यशोगाथा सांगणारे हे किल्ले आहेत.

मानाजी पायगुडे यांच्या नेतृत्वाखालील मराठी सरदारांनी 1757 मध्ये अटकेपर्यंत मराठा साम्राज्याचा दरारा निर्माण केला होता. अब्दालीचा वारसदार असलेल्या अब्दुल्ला समदखान रोहिल्ल्याचा पाडाव करुन लाहोर किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर डेरा, गाझी, मुलतान, पेशावरपर्यंत धडक मारत मराठ्यांचे साम्राज्य निर्माण केले. तंजावर ते पेशावर असे मराठ्यांचे साम्राज्य त्याकाळी प्रस्थापित केलेले होते. जी खैबरखिंड त्याकाळी आपल्या दृष्टीने पोचण्यासाठी अशक्य अशी मानली जात असे ती पार करुन तिच्या पायथ्याशी असलेल्या किल्ले जमरुडवर ताबा मिळवला. मराठा साम्राज्याच्या देदिप्यमान वारसा सांगणा-या त्या अटक आणि जमरुडच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती येथे उभारण्यात आल्या होत्या.

महिला सक्षमीकरणाची संकल्पना घेऊन भरवण्यात आलेल्या महोत्सवात भारतातील आणि महाराष्ट्रातील नामवंत व कर्तृत्ववान महिलांना मानाचा सलाम म्हणून त्यांची छायाचित्रे प्रवेशद्वारापासून पुढील मार्गिकेवर लावण्यात आली होती. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, सिंधुताई सपकाळ ही काही महाराष्ट्रातील प्रातिनिधिक नावे. तसेच क्रीडाक्षेत्रातील मेरी कोम, सायना नेहवाल, अंतराळ भरारी घेणारी कल्पना चावला यांची येथे रेखाचित्रे होती. या सर्व प्रेरणादायी महिलांचे या निमित्ताने स्मरण केले असून त्यांच्या कर्तृत्वाला या जत्रेच्या माध्यमातून सलाम करण्यात आला आहे.

या सर्वाच्या जोडीने या जत्रेत फिरताना विशेषत्वाने जाणवणारी एक गोष्ट म्हणजे येथे नजरेत भरेल अशी स्वच्छता होती. तसेच येथे येणा-या अलोट गर्दीचे नियंत्रण ही देखील एक कसोटीच आहे. पण येथील सर्व स्वयंसेवक आणि सुरक्षारक्षकांनी ही जबाबदारी चोखपणे सांभाळली. प्रचंड आणि तोबा गर्दीचे योग्य नियोजन येथे प्रकर्षाने दिसून आले आहे. यासाठी सुरक्षापथकांच्या रक्षकांसोबत सुमारे 100 इतर स्वयंसेवक येथे अष्टौप्रहर तैनात होते. त्यांच्यातील योग्य समन्वयाने येथे येणा-या गर्दीचे नियोजन उत्तमरित्या करता आले. त्यामुळे येथे भेट देणा-या लहानथोरांनी या जत्रेचा मनमुराद आनंद लुटला. या जत्रेत सुमारे 14 ते 15 विविध वयोगटातील मुले पालकांपासून हरवण्याचे प्रकार झाले. पण येथील उत्तम सुरक्षाव्यवस्थेमुळे ती लगेचच सापडली आणि त्यांना पालकांच्या सुपूर्त करण्यात आले. आणि हो फक्त लहान मुलेच नव्हे तर मोठ्या व्यक्तीदेखील आपल्या नातेवाईकांपासून दुरावण्याचे प्रकारदेखील घडले. काही नागरिकांच्या पर्स, पाकीटे हरवली, काही चो-यादेखील झाल्या. पण ठिकठिकाणी असलेल्या सीसीटीव्हींच्या आणि मोठ्या स्क्रीनच्या माध्यमातून चोर मुद्देमालासकट पकडण्यात आले आणि हरवलेल्यांची माहिती तात्काळ दाखवण्यात आली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अर्थातच यासाठी या स्वयंसेवकांची आणि आयोजकांची चोख तत्परताच कारणीभूत होती. सचिन लांडगे यांनी त्यांच्या अविरत श्रमदान या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आपल्या 300 स्वयंसेवकांच्या साथीने या स्वच्छता व सफाईच्या कार्याला मोलाचा हातभार लावला.

येथे असलेल्या महिला बचत गटांच्या विविध स्टॉलवरील खाद्यपदार्थांचे, शोभेच्या वस्तूंची जोरदार विक्री झाली. येथे महाराष्ट्राच्या विविध भागातील खाद्यसंस्कृती दर्शवणारे अनेक स्टॉल्स होते. यात कोकणी, मालवणी, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेशातील खाद्यसंस्कृती दर्शवणारे शाकाहारी व मांसाहारी पदार्थांचे विविध स्टॉल्स होते. त्यात मासवडी, खानदेशी पुरणपोळी अर्थात मांडा, मालवणी फिश या स्टॉल्सना लोकांची विशेष पसंती मिळाली. त्या स्टॉल्सवर लोकांची तुफान गर्दी असून आपली स्पेशल चव दाखवण्याची संधी या निमित्ताने या सुगरणींना मिळाली. येथे खाद्यपदार्थांच्या स्टॉल्ससोबत महिला बचतगटांनी तयार केलेल्या हॅन्डमेड वस्तूंचे देखील भरपूर स्टॉल्स होते. भोसरी मतदारसंघातील या महिला बचतगटांना या निमित्ताने एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले असून त्यांना आपली कला लोकांसमोर मांडण्याची एक अनोखी संधी उपलब्ध झाली. सहभागी प्रत्येक स्टॉलधारकाला प्रशस्तीपत्र व खास भेट देण्यात आली.

इंद्रायणी थडीचे एक विशेष आकर्षण होते ते म्हणजे मिसेस इंद्रायणी ही सौंदर्यस्पर्धा. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, बंगळूरु येथून आलेल्या एकूण सहाशे स्पर्धक महिलांमध्ये ही स्पर्धा रंगली. याचे विविध राऊंड आयोजित करण्यात आले होते. त्यापैकी अंतिम स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या स्पर्धकांमधून अंशुमाली सिंग या विजेत्या ठरल्या. त्यांना मुकुट, 50000 रुपये रोख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच द्वितीय क्रमांक सोनाली महाजन यांचा आला. त्यांना 25000 रुपये रोख व मुकुट देण्यात आला. तृतीय क्रमांक पूनम विचारे यांचा आला. त्यांना 15000 रुपये रोख व मुकुट देण्यात आला. चतुर्थ क्रमांक नेहा पांजरे यांचा व पाचवा क्रमांक तृप्ती गवळी यांचा आला. याशिवाय सोनाली महाजन यांना मिसेस शायनिंग स्टार, नेहा जगताप यांना मिसेस कॅट वॉक, डिंपल काळे यांना बेस्ट पर्सनॅलिटी, वैशाली साळवे यांना मिसेस टॅलेन्ट आणि प्रिया जंजाळ यांना मिसेस स्टाईल आयकॉन हे विशेष पुरस्कार देण्यात आले. तीन दिवस चाललेल्या या अत्यंत रंगतदार आणि उत्कंठावर्धक स्पर्धेचे परीक्षण डॉ. राधिका वाघ, संगीता तरडे, पल्लवी कौशिक, अंजली चिंचवडे यांनी केले. या स्पर्धेचे नियोजन शीतल वर्णेकर व जेट इंडियाच्या ब्रांच हेड शिरीन वास्तानी यांनी केले.

तसेच यावेळी महिला भजनी मंडळांच्या देखील स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात विविध ठिकाणांहून एकूण ७८ महिला भजनी संघांनी सहभाग घेतला. त्यात प्रथम क्रमांक दोन संघांना विभागून देण्यात आला. चिखली येथील हरिओम भजनी मंडळ आणि यमुनानगर येथील जयश्रुती महिला भजनी मंडळ यांचा प्रथम क्रमांक आला. द्वितीय क्रमांक देखील भोसरी येथील नामस्मरण बाल भजनी मंडळ आणि चोवीसावाडी येथील पांडुरंग भजनी मंडळाला विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांक रुपीनगर, तळवडे येथील विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ व दिघी गाव येथील स्वरसाधना बाल भजनी मंडळाला विभागून देण्यात आला. चौथा क्रमांक मोशी येथील संत ज्ञानेश्वर भजनी मंडळाला तर पाचवा क्रमांक मोशी येथीलच राधाकृष्ण भजनी मंडळाला देण्यात आला. या स्पर्धेसाठी काळूराम शंकर देवकर व काळूराम पवळे यांनी उत्कृष्ट संयोजन केले होते.

इंद्रायणी थडीला भेट देण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी देखील येथे घेण्यात आली. खास त्यांच्यासाठी विनामूल्य आरोग्य तपासणीची सोय करण्यात आली होती. याचा सुमारे 40000 नागरिकांनी लाभ घेतला. यात नेत्रतपासणी, स्तन कर्करोग तपासणी, नाडी परीक्षण, रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, इसीजी, हृदयरोग तपासणी, आयुर्वेदिक उपचार, त्वचारोग, पंचकर्म, स्त्रीरोग तपासणी, जनरल चेकअप आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी-चिंचवडसह पुण्यातील नामवंत रुग्णालयाील तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे या तपासण्या करण्यात आल्या. यात लॉरेन्स अँड मेयो, आयव्हीएफ हॉस्पिटल, वात्सल्य मदर अँड चाइल्ड केअर, एशियन आय हॉस्पिटल, स्टर्लिंग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, पिंपरी चिंचवड मनपा वैद्यकीय विभाग, रुबी केअर हॉस्पिटल, बिर्ला हॉस्पिटल, श्री साई सेवा हॉस्पिटल, पूजा नर्सिंग होम, देसाई अॅक्सिडेंट अँड जनरल हॉस्पिटल, डीपीयु कॉलेज यांचा समावेश होता.

तसेच या जत्रेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या जॉब फेअरमध्ये शनिवारी विविध कंपन्याकडून घेण्यात आलेल्या मुलाखतींमध्ये सुमारे 5000 इच्छुक महिला मुलींनी उमेदवारांनी सहभाग घेतला. त्यापैकी 780 आलेले आहे. महिला सक्षमीकरणासाठी उचललेले हे एक अनोखे पाऊल या निमित्ताने ठरले. याशिवाय येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्यात मंगळागौरीचे खेळ कोथरुड येथील सुहासिनी ग्रुपने सादर केले. यात शिवांजली सखी मंच आणि शिवकन्या सखी मंच व शिवाज्ञा सखी मंचाचे विशेष सहकार्य लाभले. खास महिलांसाठी आयएसएएस इंटरनॅशनल ब्युटी स्कूलतर्फे सौंदर्य कार्यशाळा घेण्यात आली. मुद्रा आर्ट गॅलरीच्या माध्यमातून हस्तशिल्पकला प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. इन्फिनिटी डान्स अँड फिटनेस या संस्थेतर्फे झुंबा या सध्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या डान्सचे हजारो लोकांना प्रशिक्षण देण्यात आले. यातील तालावर तर चक्क आमदार महेशदादा लांडगे यांची पावले देखील थरकली. त्यांनी देखील झुंबाच्या खास स्टेपवर नाचून आपली नृत्याची आवड दाखवली. या इंद्रायणी थडीमध्ये विशेषत्वाने काही गोष्टी येथे भेट देणा-या नागरिकांसाठी मोफत ठेवण्यात आल्या होत्या. टॅटू, मेंदी, बालजत्रेतील लहानांसाठीची खेळणी, साहसी खेळ येथे मोफत उपलब्ध होते. त्याचा सगळ्यांनी मनसोक्त आनंद घेतला. येथे जादूगार ईश्वर यांनी चारही दिवस दिवसातून तीन ते चार वेळा आपले जादूचे गंमतीदार प्रयोग दाखवून उपस्थितांचे भरपूर मनोरंजन केले. परिसरातील विविध शाळांमधील सुमारे 50000 विद्यार्थ्यांनी येथे भेट देऊन योगा प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला. त्यांच्या नेण्याआणण्याची 120 बसेसच्या माध्यमातून मोफत सोय करण्यात आली होती. येथे आयोजित करण्यात आलेल्या नृत्यस्पर्धेत 200 स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यातून अंतिम स्पर्धेसाठी 87 जणांची निवड केली. त्यात वैयक्तिक प्रकारात साची दौंडकर हिचा प्रथम, विकास वाघमारे याचा द्वितीय आणि ईश्वर कदम याचा तृतीय क्रमांक आला. तसेच सांघिक प्रकारात प्रथम क्रमांक एंजल डान्स अॅकॅडमी, द्वितीय क्रमांक इन टू द स्ट्रीट यांचा व तृतीय क्रमांक तालवृंद ग्रुप यांचा आला. बेस्ट पेहराव चिन्मयी शर्मा व साक्षी अँड ग्रुप यांना मिळाला. तसेच बेस्ट कोरिओग्राफी सागर यादव व रिदम डान्स ग्रुप यांना व बेस्ट परफॉर्मन्स आदित्य वालझडे आणि जीएनडी डान्स ग्रुप यांना मिळाला.

आमदार महेशदादा लांडगे यांच्या व्हिजन 2020 च्या लेखाजोखा या एक लाख पत्रिकांचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच व्हीव्हीपॅट मशीनचा 6000 लोकांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एलइडीच्या माध्यमातून सकाळी दहा ते रात्री दहावाजेपर्यंत ब्रॅंडिग करण्यात आले. रॉबीनहूड आर्मीच्या माध्यमातून येथे उरलेल्या अन्नपदार्थांचे गरजूंना मोफत वाटप करण्यात आले. रॉबिनहूड आर्मीच्या सदस्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

आमदार महेशदादा लांडगे – इंद्रायणी थडी या लोकजत्रेला लोकांनी जो भरभरुन प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आपल्या नागरिकांसाठी अशा प्रकारची जत्रा भरवावी असे खूप दिवसांपासून मनात होते. त्याला या निमित्ताने बळ मिळाले. महिलांसाठी एक भव्य आणि उपयुक्त व्यासपीठ यामुळे मिळाले. त्यांच्या काम करणा-या हातांना प्रेरणा मिळाली. यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते असे म्हणतात पण नव्या युगात वावरताना आपण स्त्रिला बरोबरीचे स्थान देऊन तिला सर्वच क्षेत्रात सक्षम बनवायला हवे असे मला वाटते. यंदा ही जत्रा अभूतपूर्व अशी झाली असून पुढीलकाळात देखील ही जत्रा भरवण्याचा आमचा विचार आहे. अर्थातच माझे मतदार बंधूभगिनी त्याला यंदासारखाच भरभरुन पाठिंबा देतील अशी मला पूर्णपणे खात्री आहे.

पूजा लांडगे, अध्यक्ष, शिवांजली सखी मंच – महिला बचत गटांच्या माध्यमातून काम करणा-या हातांना बळ मिळावे म्हणून या इंद्रायणी थडीचे आयोजन करण्यात आले. यासाठी मी व माझ्या महिला सहका-यांनी अथक परिश्रम घेतले. मागील काही दिवस हळदीकुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून परिसरातील वाड्या, वस्त्या, सोसायट्या येथे आम्ही फिरलो. त्यांचे प्रश्न जाणून घेतले आणि त्याच्या प्रश्नांना थोडेफार उत्तर म्हणून अशा प्रकारचा खास महिला बचतगटांसाठी कार्यक्रम आयोजित केला. त्याला माझ्या सगळ्या भगिनींनी भरघोस पाठिंबा दिला. त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. यापुढील काळातही महिला बचतगटांना आधार देण्यासाठी अशाच प्रकारचे कार्यक्रम मी माझ्या माध्यमातून आयेजित करणार आहे.

वैशाली भालेकर – सर्वसामान्य महिलेच्या प्रश्नाकडे आमदार महेशदादा लांडगे व पूजाताई लांडगे यांनी लक्ष घातले. त्यामुळे त्यांच्या उत्पादनांना मार्केट मिळावे म्हणून इंद्रायणी थडीचे आयोजन केले. येथे आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला. धंदा वाढवावा कसा याचे ज्ञान मिळाले. यातून मिळालेल्या अनुभवांच्या जोरावर भविष्यात काम करण्यासाठी बळ मिळाले.

उषा गोरे, स्वामिनी महिला बचतगट – महिला सशक्तीकरणाच्या दिशेने टाकलेले एक भरीव पाऊल असे मी या इंद्रायणी थडीचे वर्णन करेन. बोलणारे खूप असतात पण काम करणारे फक्त आणि फक्त महेशदादा लांडगेच आहेत हे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. आपल्या मातीची ओळख घेऊन ते नागरिकांसमोर पुन्हा एकदा आले असून तळागाळातील सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांचा वसा यानिमित्ताने दिसून आला.

यंदा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या इंद्रायणीथडीच्या अभूतपूर्व अशा यशस्वी आयोजनानंतर पुढील वर्षी काय याचा येथे भेट देणा-या प्रत्येकालाच प्रश्न पडला असेल. रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल याप्रमाणे यंदाच्या यशस्वी आयोजनातच पुढील वर्षांच्या आयोजनाची बीजे आहेत असे म्हटले तर नक्कीच वावगे ठरणार नाही.

 

.

HB_POST_END_FTR-A1
.