_MPC_DIR_MPU_III

Bhosari : इंद्रायणी थडी हे महिला सक्षमीकरणासाठी टाकलेले महत्वपूर्ण पाऊल – शैला मोळक

एमपीसी न्यूज – शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने व आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित इंद्रायणी थडी हे महिला सक्षमीकरणासाठी टाकलेले महत्वपूर्ण पाऊल आहे. बचत गट चळवळ बळकट करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्वपूर्ण ठरला आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शैला मोळक यांनी येथे केले.

_MPC_DIR_MPU_IV

भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ गंधर्वनगरी मोशी येथे आयोजित बैठकीत शैला मोळक बोलत होत्या. यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, माजी उपमहापौर शरद बो-हाडे, नगरसेवक वसंत बोराटे, नगरसेविका अश्विनी जाधव, सारिका बो-हाडे, शिवांजली सखी मंचच्या पूजाताई लांडगे, माजी नगरसेवक बबनराव बोराटे, शिवसेनेचे भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

मोळक म्हणाल्या की, पुण्यात आयोजित केली जाणारी भीम थडी, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित केली जाणारी पवना थडी अशा जत्रेच्या धर्तीवर भोसरीसह समाविष्ट गावांसाठी स्वतंत्र जत्रा आणि कार्यक्रम आयोजित केले जावेत अशी तेथील स्थानिक नागरिक आणि महिलांची अपेक्षा होती. भोसरी विधानसभा मतदारसंघात महिला बचतगटांचा उपयोग केवळ निवडणुकांच्या तोंडावर मतांचा जोगवा मागण्यासाठी केला जात होता. मात्र, मतदारसंघातील माता भगिनींना महिला सक्षमीकरणासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी आमदार महेश लांडगे व पूजाताई लांडगे यांनी इंद्रायणी थडीचे आयोजन केले. जत्रेला चार दिवसात 5 लाख नागरिकांनी भेट दिली. भोसरी मतदारसंघातील 580 महिला गटांनी या जत्रेत सहभाग दर्शविला. या जत्रेत सुमारे 4.5 कोटी रुपयांची उलाढाल झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली होती याची आठवण मोळक यांनी करून दिली.

पुढील वर्षाच्या इंद्रायणी थडीचेही नियोजन सुरु असून जानेवारी अथवा फेब्रुवारी 2020मध्ये इंद्रायणी थडीचे आयोजन अशाच भव्य दिव्य पद्धतीने करण्यात येणार असल्याचे शिवांजली सखी मंचच्या पूजाताई लांडगे यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.