Bhosari: भोसरी, खेड विधानसभेच्या शिवसेना सहसंपर्क प्रमुखपदी इरफान सय्यद

एमपीसी न्यूज – शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष, कामगार नेते इरफान सय्यद यांची भोसरी आणि खेड विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये भोसरी आणि खेड विधानसभा मतदारसंघाच्या सहसंपर्क प्रमुखपदी इरफान सय्यद यांची वर्णा लागली आहे. सय्यद शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष आहेत. तर, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत.

या संघटनेच्या माध्यमातून सय्यद यांनी कामगारांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. कामगारांची फौज शिवसेनेच्या मागे उभी केली आहे. संघटना वाढीसाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कामाची देखील घेऊन पक्षाने त्यांच्यावर आता संघटनेतील नवीन जबाबदारी सोपविली आहे. भोसरी आणि खेड विधानसभा मतदारसंघाच्या सहसंपर्कप्रमुखपदी सय्यद यांच्या रुपाने तरुण आणि आक्रमक चेह-याची नियुक्ती झाल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. संघटनेत काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो. संघटना वाढीसाठी मनापासून प्रयत्न करणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे, निवडीनंतर इरफान सय्यद यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.