Bhosari: भोसरीतील रुग्णालयामध्ये 40 खाटांचा कोरोना विलगीकरण कक्ष

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरीत 100 खाटांच्या क्षमतेचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. कोरोनाच्या रुग्णांसाठी या रुग्णालयाच्या इमारतीमध्ये 40 खाटांचा कोरोना विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले असल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. तसेच शहरात एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही. पाच संशयित रुग्ण आढळले असून त्यांना वायसीएममध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने पुण्यातील एनआयव्ही येथे तपासणीसाठी पाठविल्याचे त्यांनी सांगितले.

चीनमध्ये हडकंप माजविलेला कोरोना व्हायरस भारतात दाखल झाला आहे. कोरोनाने महाराष्ट्रात देखील शिरकाव केला आहे. पुण्यात पाच कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर, पिंपरी-चिंचवड पाच संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापार्श्वभुमीवर पिंपरी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्त हर्डीकर यांनी दिली. महापालिकेच्या वतीने भोसरीत 100 खाटांच्या क्षमतेचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. सुसज्ज असे रुग्णालय तयार आहे. या रुग्णालयात 40 खाटांचे कोरोना विलगीकरण शिबिर तयार करण्यात आले आहे. तसेच वायसीएममध्ये महिलांसाठी पाच आणि पुरुषांसाठी पाच अशा दहा खाटा तयार आहेत. दोन व्हेंटिलेटर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामध्ये चीन आणि इतर देशातून आलेल्या प्रवाशांचा 14 दिवस वैद्यकीय विभागामार्फत राज्य सरकारने दिलेल्या सुचनेनुसार पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत 31 प्रवाशांचा पाठपुरावा वैद्यकीय विभागामार्फत केला आहे. त्यापैकी 20 प्रवाशांचे पाठपुराव्याचे 14 दिवस पुर्ण झाले. त्यापैकी एकाही प्रवाशाला कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, आयएमए, पीडीडीए, निमा या वैद्यकीय संघटना यांची कार्यशाळा वैद्यकीय विभागामार्फत घेण्यात आली आहे. परदेशातून आलेल्या प्रवाशांची माहिती ई-मेलद्वारे महापालिकेला कळविण्याचे निर्देश दिले आहेत.

महापालिकेमार्फत मोठे चौक, प्रभाग कार्यालये, दवाखाने, रुग्णालये, खासगी रुग्णालये अशा 164 ठिकाणी जनजागृतीचे फलक लावले आहेत. 15 लाख पत्रकांचे वाटप केले आहे. पाच हजार स्टिकर्स, पोस्टर दवाखाने, खासगी रुग्णालयात चिटकविण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रसार ‘ड्रॉप’ लेनच्या माध्यमातून होतो. त्यासाठी वेळोवेळी साबणाने व्यवस्थित हात धुवावा. हस्तांदोलन, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. हे उपाय केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, असेही आयुक्तांनी सांगितले. तसेच वैद्यकीय सल्ल्यानुसारच मास्कचा वापर करावा. खोकला झाल्यास डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.