Bhosari: बॅडमिंटन हॉलच्या नामकरणावरुन भाजप नगरसेवकांमध्ये शह-काटशह !

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने विकसित केलेल्या भोसरीतील प्रभाग क्रमांक पाच गवळीनगर, संत तुकारामनगर मधील बॅडमिंटन हॉलच्या नामकरणावरुन सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांमध्ये शह-काटशहाचे राजकारण रंगले आहे. स्वपक्षाच्याच नगरसेविकेच्या पाठपुराव्याने वर्षभरापूर्वी नामकरणाचे मंजूर झालेले ठराव रद्द करत नवीन ठराव मंजूर करण्यात आला आहे.

महापालिकेतर्फे प्रभाग क्रमांक पाच येथे बॅडमिंटन हॉल विकसित करण्यात आला आहे. भाजप नगरसेविका प्रियंका बारसे यांच्या पुढाकाराने हॉलला कै. सु. ना. बारसे यांचे नाव देण्याचा ठराव 7 डिसेंबर 2017 रोजी ‘इ’ प्रभाग समितीच्या बैठकीत मंजूर झाला होता. एक महिन्याची मुदत देऊन तो ठराव जानेवारी 2018 मध्ये कायम करण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी (दि.7) ‘इ’ प्रभाग समितीच्या झालेल्या बैठकीत कै. सु. ना. बारसे यांचे नाव देण्याचा ठराव रद्द करत बॅडमिंटन हॉलचे कै. शंकर परशुराम गवळी असे नामकरण करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

ठरावत बदल करण्यास भाजपच्या नगरसेविका प्रियंका बारसे यांनी विरोध दर्शविला. त्यानंतर कै. सु.ना. बारसे यांचे नाव देण्याचा ठराव रद्द करण्यासाठी मतदान घेण्यात आले. नऊ विरुद्ध एक या मताने बारसे यांचे नाव देण्याचा ठराव रद्द करण्यात आला. गवळी यांच्या प्रस्तावाच्या बाजुने राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने देखील मतदान केले. स्वपक्षाच्याच नगरसेविकेने केलेला ठराव रद्द केल्याने सत्ताधा-यांमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

नगरसेविका प्रियंका बारसे म्हणाल्या, ”भोसरीतील बॅडमिंटन हॉलला कै. सु. ना. बारसे यांचे नाव देण्याचा ठराव 7 डिसेंबर 2017 रोजी ‘इ’ प्रभाग समितीच्या बैठकीत मंजूर झाला होता. एक महिन्याची मुदत देऊन तो ठराव जानेवारी 2018 मध्ये कायम करण्यात आला. त्यानंतर फेब्रुवारी 2018 मध्ये नगरसेवक सागर गवळी यांनी कै. सु.ना.बारसे या ठरावाची अमंलबजावणी करु नये, असे पत्र प्रशासनाला दिले. प्रशासनाने हे पत्र 10 महिने माझ्यापासून दडवून ठेवले. नामकरणाबाबत विचारणा केली तरी प्रशासनाकडून उत्तर दिले जात नव्हते. शुक्रवारी झालेल्या ‘इ’ प्रभाग समितीच्या विषयपत्रिकेवर कै. सु. ना. बारसे हा प्रस्ताव रद्द करत बॅडमिंटन हॉलला कै. शंकर परशुराम गवळी असे नाव देण्याचा विषय आला. त्याला मी आक्षेप घेतला. त्यानंतर कै. सु.ना.बारसे प्रस्ताव रद्द करण्यासाठी मतदान घेण्यात आले. त्याला भाजपच्याच नगरसेवकांनी विरोध केला”

बॅडमिंटन हॉलला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु, या प्रस्तावाचा विचार केला जाणार नसल्याचे सांगत तो प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आला, असा आरोपही बारसे यांनी केला. नगरसेवक आमच्यावर दडपशाही करत आहेत. दादागिरीने कामे सुरु आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

नगरसेवक सागर गवळी म्हणाले, “बॅडमिंटन हॉलला कै. सु. ना. बारसे यांचे नाव देण्याचा ठराव झाल्यानंतर त्याला स्थगिती देण्याचे पत्र मी दिले होते. त्यामुळे नियमानुसारच ठरावात बदल करण्यात आला आहे”

‘इ’ प्रभागाचे प्रभारी क्षेत्रिय अधिकारी श्रीनिवास दांगट म्हणाले, “महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसारच ठरावत बदल करण्यात आला आहे. त्यामध्ये नियमाचे कोणतेही उल्लंघन झालेले नाही. कै. सु.ना.बारसे या ठरावाची अमंलबजावणी करु नये असे नगरसेवक सागर गवळी यांचे पत्र प्राप्त झाले होते. त्याची माहिती नगरसेविका प्रियंका बारसे यांना देण्यात आली होती”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.