Chinchwad : रतन टाटा यांची चिंचवडगावातील युवा उद्योजकाच्या इलेक्ट्रिक दुचाकी प्रकल्पामध्ये गुंतवणूक

एमपीसी न्यूज- विजेवर चालणाऱ्या मोटारी, दुचाकी ही आता काळाची गरज बनली आहे. चिंचवडगावातील युवा उद्योजक कपिल शेळके यांच्या टॉर्क मोटर्स या कंपनीने एक अत्याधुनिक इलेक्ट्रिकल बाइकची निर्मिती केली आहे. सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी या इलेक्ट्रिकल बाइकची दखल घेतली असून टॉर्क मोटर्सच्या या प्रकल्पासाठी चक्क गुंतवणूक देखील केलेली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचे नाव इलेक्ट्रिकल बाइक उत्पादनासाठी झळकणार हे निश्चित !

काळाची गरज ओळखून अनेक नामवंत कंपन्या विजेवर चालणाऱ्या मोटारी, दुचाकी वाहन निर्मितीकडे वळलेल्या पाहायला मिळतात. त्या दृष्टीने संशोधन करून अधिकाधिक गुणवतापूर्ण इलेक्ट्रिक व्हेईकल ग्राहकांना मिळावी या दृष्टीने काही कंपन्यांनी संशोधन देखील सुरु केले आहे. भोसरी एमआयडीसी मधील डी ब्लॉकमध्ये असलेल्या टॉर्क मोटर्स या कंपनीने संपूर्ण भारतीय बनावटीच्या इलेक्ट्रिकल बाइकची निर्मिती केली आहे. आकुर्डीच्या डॉ. डी वाय पाटील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेले युवा उद्योजक कपिल शेळके हे या कंपनीचे प्रवर्तक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. संशोधनाची पराकाष्ठा करून या इलेक्ट्रिक बाइकची निर्मिती करण्यात आलेली आहे. ही बाइक एका चार्जींगमध्ये ताशी १०० किमी वेगाने १०० किमी पर्यंत धावू शकते असा दावा कंपनीने केला आहे.

सर्वात महत्वाची आणि उल्लेखनीय बाब म्हणजे या बाईकने टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या बाइकच्या उत्पादनासाठी रतन टाटा यांनी गुंतवणूक देखील केली असल्याचे कपिल शेळके यांनी सांगितले. या बाबत बोलताना शेळके म्हणाले,” रतन टाटा यांच्यासारख्या दिग्गज उद्योजकाने माझ्यासारख्या युवा उद्योजकाला दिलेले हे प्रोत्साहन आहे. रतन टाटा यांचे काही अधिकाऱ्यांनी माझ्या कंपनीला भेट देऊन त्यांनी या बाइकच्या उत्पादनासंबंधी संपूर्ण माहिती जाणून घेतली. तसेच ही बाइक चालवून देखील पहिली. त्यानंतर रतन टाटा यांनी या प्रकल्पासाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. सध्या वाहन निर्मिती उद्योग एका वेगळ्या संक्रमणामधून जात आहे. भारतातील इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रासाठी खूप मोठी संधी निर्माण झाली असून रतन टाटा यांच्या मार्गदर्शन आणि पाठबळामुळे आम्ही अधिक उत्तम दर्जाच्या इलेक्ट्रिक बाइक निर्मिती करून भारतामधील इ बाइक निर्मिती क्षेत्राला चालना देण्याचे काम करू” असा आत्मविश्वास कपिल शेळके यांनी व्यक्त केला.

रतन टाटा म्हणाले, ” मागील काही वर्षांपासून वाहन उद्योग क्षेत्रामध्ये बदल घडून येत असून इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला वेग आलेला आहे. टॉर्क मोटर्सच्या इ बाइकमुळे मी प्रभावित झालो असून प्रत्येक भारतीय उद्योजकांनी देखील आपल्यामध्ये अशा प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करावा”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.