Bhosari : मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीगाठीने आमदार लांडगे यांच्या प्रचाराची सांगता

एमपीसी न्यूज – भेटीगाठी आणि पदयात्रा काढून आमदार महेश लांडगे यांच्या प्रचाराची सांगता झाली. भोसरीमधील गव्हाणे वस्ती येथे त्यांनी भेटीगाठी घेत प्रचाराची सांगता केली. मागील पाच वर्षात केलेली विकासकामे नागरिकांपर्यंत पोहोचवणे हेच आमदार महेश लांडगे यांच्या प्रचाराचे मुख्य सूत्र राहिले.

विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची आज (शनिवारी) सांगता झाली. दिवसभर सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपीत देखील महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी गाठीभेटीचा सूर कायम ठेवला. शेवटच्या क्षणापर्यंत कार्यकर्ते आणि नागरिकांनी आमदार महेश लांडगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आमदार लांडगे यांनी 4 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनतर त्यांनी भोसरी विधानसभेचा सर्व भाग पदयात्रेने पिंजून काढला. ठिकठिकाणी त्यांचे फटाक्यांच्या आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

आमदार महेश लांडगे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा तडाखा लावला. पिंपरी-चिंचवड महापालिका, राज्य शासन यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामे मार्गी लावली. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, बफर झोन, पोलीस आयुक्तालय, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, आन्द्रा, भामा-आसखेड धरणातून पाणीपुरवठा, संतपीठ, संविधान भवन, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, सफारी पार्क, इंद्रायणी थडी आदी प्रकल्प आणि उपक्रम त्यांचे विशेष राहिले. याशिवाय लोकोपयोगी अनेक उपक्रम त्यांनी सक्रियपणे मतदारसंघात राबवले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ 10 ऑक्टोबर रोजी भोसरी परिसरातून रॅली काढली. या रॅलीला भोसरीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांनतर 18 ऑक्टोबर रोजी महायुतीची विजयी संकल्प सभा झाली. सभेसाठी महायुतीच्या घटकपक्षातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय ठिकठिकाणी कोपरा सभा, पदयात्रा आणि गाठीभेटी घेऊन आमदार महेश लांडगे यांनी प्रचार केला. ‘

पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट’ या संकल्पनेतून आमदार लांडगे  यांनी सर्व कार्यकर्त्यांना विरोधकांच्या आरोपांवर प्रतिआरोप अथवा संवाद करणे टाळण्याचे आवाहन केले. आमदार लांडगे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी या माध्यमातून देखील प्रचाराचा अनोखा पायंडा घालून दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.