Bhosari News: शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या घरी आमदार महेश लांडगे यांनी साजरे केले रक्षाबंधन!

एमपीसी न्यूज – कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात बहिरेवाडी नावाचे गाव आहे. या गावातील शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या बहिणीला भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी बहीण मानले. रक्षाबंधन निमित्त जोंधळे कुटुंबीयांच्या घरी रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यावेळी बहीण कल्याणी जोंधळे हिला दुचाकी आणि लॅपटॉप ओवाळणी दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद ऋषिकेश यांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले. यावेळी शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांचे वडील रामचंद्र जोधळे, कोल्हापूर जिल्हा आजी माजी सैनिक वेल्फेअर संघटनेचे अध्यक्ष खांडेकर, कागल तालुका आजी-माजी संघटनेचे अध्यक्ष आनंदा पाटील, सदस्य बाजीराव पवार, प्रभाकर आत्माराम पाटील, विजयकुमार पाटील, मोहन कांबळे, लक्ष्मण कांबळे, जवान बाळकृष्ण चव्हाण, महेश मार्तंड, श्रीपती मस्कर, बळीराम पाटील, शिवाजीराव पवार आदी उपस्थित होते.

महेश लांडगे म्हणाले की, सीमेवर लढणारे जवान, आजी- माजी सैनिकांप्रती देशातील प्रत्येक बांधवाला आदर आहे. कोल्हापूरच्या मातीशी माझ्या कुटुंबाचे विशेष नाते आहे. कसबा बावड्याच्या शासकीय कुस्ती केंद्रामध्ये उत्तमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवले. शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांना पाकिस्तान सीमेवर लढताना वीरमरण आले. त्यांच्या कुटुंबीयांची मानसिक अवस्था शब्दात व्यक्त न करता येणारी आहे.

माझी व माझ्या कार्यकर्त्यांची राजकारण आणि पक्षविरहीत भावना आहे. कल्याणी जोंधळे हिला भाऊबीजेच्या दिवशी स्वत: भाऊ गमवावा लागला. मी आमदार असो किंवा नाही ऋषिकेशसारखा भाऊ समजून कधीही अडचणीच्या काळात मला हाक दे. हा भाऊ तुझ्या मदतीला धावून येईल. तुझ्या कुटुंबासोबत उभा राहील. शिक्षण, नोकरी आणि आयुष्यातील प्रत्येक वळणावर सोबत राहील, असेही आमदार लांडगे म्हणाले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोंधळे कुटुंबियांना घर बांधण्यासाठी मदत केली. घरचा वरचा मजला आमदार महेश लांडगे बांधून देणार आहेत. तसेच, कल्याणी हिला दुचाकी आणि लॅपटॉपही रक्षाबंधन निमित्त भेट देण्यात आला.

शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांची बहीण कल्याणी जोंधळे ही इंटेरिअर डिझाईन शाखेची विद्यार्थीनी आहे. नुकतेच तीचे लग्नही ठरले आहे. तीचे होणारे पती हे सिव्हील इंजिनिअर आहेत. कल्याणीच्या लग्नासाठी आणि पुढील शिक्षणासाठीही सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे.

कोल्हापूर- सांगली आणि सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. लष्कारात भरती होण्यासाठी इथला युवक अपार कष्ट करतो. बहिरेवाडी गावानेही हाच वसा जपला आहे. देशाप्रति बलिदान देण्याची भावना आणि आदर्श या गावाने निर्माण केली आहे. अशा गावातील शहीद जवानाच्या बहिणीला स्वत:ची बहीण मानून रक्षाबंधनासाठी राखी बांधण्यासाठी आमदार महेश लांडगे बहिरेवाडी येथे आले.

दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी मु. पो. निगवे खालसा, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथील शहीद हवालदार संग्राम पाटील (सिक्स मराठा) यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. संग्राम पाटील यांना पुँच्छ सेक्टर काश्मिरमध्ये 21 नोव्हेंबर 2020 रोजी वीरमरण आले होते. वीरपत्नी हेमलता पाटील यांच्याकडून आमदार लांडगे यांनी राखी बांधून घेतली आणि रक्षाबंधन सण साजरा केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.