Bhosari : आईचा लटकता मृतदेह आणि हंबरडा फोडणारी चिमुकली; भोसरी येथील हृदयद्रावक घटना

Bhosari: Mother's hanging corpse and Screaming of little Girl; Heartbreaking incident at Bhosari विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा; पतीला अटक

एमपीसी न्यूज – रात्री आईच्या कुशीत शांत झोपलेल्या चिमुकलीचे डोळे सकाळी आईच्या लटकत्या मृतदेहासमोर उघडले. आपल्या डोक्यावरील आईचे छप्पर उडाल्याची जाणीव त्या लहानग्या जीवाला झाली आणि चिमुकलीने एकच हंबरडा फोडला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी (दि. 13) सकाळी विकास कॉलनी, भोसरी येथे उघडकीस आली.

प्रज्ञा मनोज भोरे (वय 34, रा. विकासनगर कॉलनी, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयत महिलेचा भाऊ विनायक विलास वाघमारे (वय 40, धारावी, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी आरोपी पती मनोज बंसीधर भोरे (वय 39, रा. भोरे निवास, विकास कॉलनी, भोसरी) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज याला दारूचे व्यसन होते. तो एका ठिकाणी कामधंदा करीत नसल्याने मनोज आणि मयत पत्नी प्रज्ञा यांच्यात वारंवार भांडण होत असे. सन 2015 पासून आरोपी मनोज त्याच्या मयत पत्नीवर संशय घेऊन तिला मारहाण व शिवीगाळ करीत असे.

_MPC_DIR_MPU_II

शुक्रवारी रात्री मनोज दारू पिऊन आला. त्यानंतर पती-पत्नीचे कडाक्याचे भांडण झाले. त्याने प्रज्ञा यांना मारहाण केली. त्यानंतर मनोज घराबाहेर निघून गेला. प्रज्ञा शुक्रवारी रात्री त्यांच्या सहा वर्षाच्या मुलीला घेऊन स्वयंपाकघरात झोपण्यास गेल्या. आई सारखी रडत असल्याचे बघून त्या सहा वर्षाच्या चिमुकलीने आईचे डोळे पुसले. आई रडू नको ना, असे म्हणत मुलीने आईला धीर दिला. रात्री उशिरा मुलीला आईच्या कुशीत गाढ झोप लागली.

शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता चिमुकलीला आजीच्या हाका मारण्याचा आवाज आल्याने जाग आली. मुलगी झोपेतून उठली तेंव्हा तिला तिच्या आईचा मृतदेह स्वयंपाकघरात लटकत असल्याचे दिसले. तिने आपली आई आपल्याला सोडून गेल्याचे ओळखले आणि मोठ्याने हंबरडा फोडला.

रडत रडत चिमुकलीने स्वयंपाकघराच्या दरवाजाची कडी उघडली. आजी आत आली असता आजीला देखील प्रज्ञा यांचा मृतदेह दिसला. त्यानाही मोठ्याने रडू कोसळले. प्रज्ञा यांनी स्वयंपाकघरातील छताच्या हुकाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला होता. शेजारच्या नागरिकांच्या मदतीने आजीने प्रज्ञा यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

प्रज्ञा यांचा शारीरिक व मानसिक छळ करून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पती मनोज याला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.