Bhosari : अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून बहिणीच्या पतीचा कोयत्याने वार करून खून

एमपीसी न्यूज – बहिणीच्या पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून मेहुण्याने दाजींवर कोयत्याने वार करून खून केला. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि. 10) पहाटे दोनच्या सुमारास धावडे वस्ती, गणेश नगर, भोसरी परिसरात घडली.

मोहन बाबुराव लेवडे (वय 45, रा. धावडे वस्ती, गणेश नगर, भोसरी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मृताची पत्नी नंदा मोहन लेवडे (वय 34) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विष्णू मुंजाजी जगाडे (वय 30, रा. जरी, ता. जि. परभणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विष्णू याला अटक केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विष्णू हा फिर्यादी नंदा यांचा भाऊ आहे. नंदाचे पती मोहन यांचे घराजवळ राहणा-या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. यावरून नंदा आणि मोहन यांच्यामध्ये वारंवार भांडण होत होते. तसेच मोहन नंदाकडे घटस्फोटाची मागणी करत होते.

नंदा आणि मोहन यांची भांडणे सोडविण्यासाठी विष्णू मागील काही दिवसांपूर्वी नंदा यांच्या घरी आला होता. रविवारी रात्री मोहन आणि विष्णू दोघेजण घराच्या टेरेसवर दारू पित बसले होते. विष्णूने मोहन यांना पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोहन आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे चिडलेल्या विष्णूने लोखंडी कोयत्याने वार करत मोहन यांचा खून केला.

मोहन यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून नंदा धावत टेरेसवर आल्या. त्यावेळी मोहन रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तर, विष्णू हातात रक्ताने माखलेला कोयता घेऊन उभा होता. त्यानंतर विष्णूने स्वतः पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत विष्णूला अटक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.