Bhosari : विवाहितेच्या मृत्यूचे गूढ उलगडले ! आई-वडिलांच्या सांगण्यावरून मुलाने केला पत्नीचा खून

एमपीसी न्यूज – घरामध्ये मृतावस्थेत आढळून आलेल्या विवाहित महिलेच्या मृत्यूचे गूढ उलगडण्यात भोसरी पोलिसांना यश आले आहे. या महिलेचा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून आईवडिलांच्या सांगण्यावरून आपल्या पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

सारिका योगेश देसाई (वय 23, रा. धावडेवस्ती, भोसरी) यांचा मृतदेह आढळून आला होता. खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी सारिका यांच्या आई अनिता राजकुमार बिराजदार (वय 40, रा. शिर्पनहळ्ळी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती योगेश इराण्णा देसाई (वय 26), सासरे इराण्णा देसाई, सासू विमल देसाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १९) धावडेवस्ती मधील एका घरात सारिका यांचा मृतदेह आढळून आला होता. मृत सारिका आणि आरोपी योगेश यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर योगेश आणि सारिका यांची घरगुती कारणावरून वारंवार भांडणे होत असत. त्याचबरोबर त्यांचे सासू-सास-यांसोबत देखील वारंवार वाद होत होते. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी सारिका आणि योगेश यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे दोघेही सोलापूरहून पुण्याला येऊन राहू लागले. याचा राग सासू-सास-यांच्या मनात होता. यामुळे सासू-सास-यांनी मुलगा योगेश याला सारिकाचा खून करण्यासाठी प्रवृत्त केले.

मंगळवारी सायंकाळी सारिका आणि योगेश दोघेच घरात होते. योगेशने सारिकाचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर तो बाहेर निघून गेला. काही वेळाने परत येऊन पत्नी बेशुद्धावस्थेत पडल्याचे त्याने सर्वांना सांगितले. त्यानुसार, भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सारिका यांचा मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदन अहवालात सारिका यांचा मृत्यू गळा आवळल्याने झाला असल्याचे निष्पन्न झाले. भोसरी पोलिसांनी आरोपी पती योगेश याला अटक केली. पोलिसी खाक्या दाखवत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.