Bhosari: अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे अध्यक्ष नंदकुमार लांडे यांचा राजीनामा

एमपीसी न्यूज – अण्णासाहेब मगर सहकारी बँकेत कर्जवाटप, आर्थिक व्यवहारामध्ये रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चौकशी होण्याच्या भीतीने बँकेचे अध्यक्ष नंदकुमार लांडे यांनी तडकाफडकी अध्यक्ष व संचालकपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. मात्र, आपण वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे लांडे यांनी राजीनामा अर्जात म्हटले आहे. 25 फेब्रुवारी 2019 रोजीच त्यांनी राजीनामा दिला आहे.

अण्णासाहेब मगर सहकारी बँकेत कर्जवाटप, आर्थिक व्यवहारामध्ये रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच बँकेचे अध्यक्ष नंदकुमार लांडे अधिनियमाचे कलम 73 कअ (1)(एक)(क)(एक)नुसार कसूरदार ठरले असून बँकेचे संचालक राहण्यास अपात्र ठरल्याचे सकृतदर्शनी दिसून येत असल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचे अप्पर निबंधक डॉ. किशोर तोष्णिवाल यांनी लांडे यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. तसेच 20 मार्च 2019 रोजी होणा-या सुनावणीस हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 कअ नुसार लांडे हे कसूरदार ठरले आहेत. त्यामुळे ते बँकेचे संचालक राहण्यास अपात्र ठरले असल्याचे तसेच ते पोटकलम (2) नुसार बँकेचे संचालक असल्याचे बंद झाल्याचे आणि त्यांची जागा रिक्त झाल्याचे का घोषित करण्यात येऊ नये ?, याबाबतचे म्हणणे मांडण्यासाठी 20 मार्च 2019 रोजी सकाळी साडेअकरा वाजता व्यक्तीश: अथवा कायदेशीर प्रतिनिधी मार्फत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

तत्पुर्वीच नंदकुमार लांडे यांनी अध्यक्ष व संचालकपदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. 25 फेब्रुवारी 2019 रोजी सहकार आयुक्त व निबंधक यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात वैयक्तिक कारणामुळे अध्यक्ष व संचालकपदाचा राजीनामा देत असल्याचे लांडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, चौकशी होण्याची शक्यता दिसताच लांडे यांनी राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा भोसरी परिसरात सुरु आहे.

याबाबत नंदकुमार लांडे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.