Bhosari : …तर औद्योगिक क्षेत्रातीलल अपघात कमी होतील

एमपीसी न्यूज – आपली सुरक्षा हेच आपले कर्तृत्व समजल्यास औद्योगिक क्षेत्रातील अपघात कमी होतील, असे प्रतिपादन साज ऑफ उद्योग समूहाचे संस्थापक प्रकाश जगताप यांनी केले.

भोसरी येथील क्‍वॉलिटी सर्कल एक्‍सलन्स सेंटर या सभागृहात 48 व्या राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहानिमित्त क्‍वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे शाखेच्या वतीने उद्योग समूहासाठी औद्योगिक सुरक्षितता, वाहतूक, प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना या स्पर्धा नाटीका, प्रबंध सादरीकरणाच्या माध्यमातून स्पर्धा पार पडल्या. तसेच कामगारांनी कल्पकतेतून तयार केलेले भित्तीपत्र, स्लोगन स्पर्धेत यशस्वी ठरलेले 28 उद्योग समूहातील 70 संघांना सुवर्ण 25 संघांना सिल्व्हर तर 5 सहभागी संघांना रजत पदक, स्मृतिचिन्हाच्या स्वरूपात उद्योजक प्रकाश जगताप, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ. प्रकाश राजहंस, क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

त्यात जेसीबी इंडिया लिमिटेड, टाटा मोटर्स, किर्लोस्कर ऑईल इंजिन, एस.के.एफ. इंडिया, गॅबरील इंडिया, फोर्बेस मार्शल, बजाज ऑटो, आयटीसी फुड इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रिज, बॉश चासीज सिस्टीम्स इंडिया, मिंडा आदी उद्योग समूहातील 300 स्पर्धक कामगारांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रसंगी अनंत क्षीरसागर, परिषक निखिला शिरोडकर, संजीव शिंदे आदी उपस्थित होते. सकाळच्या सत्रात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे स्पर्धेचे उद्‌घाटन रांजणगाव येथील आयटीसी फूड उद्योग समूहाचे विभाग प्रमुख मलय शहा यांच्या हस्ते झाले.

यावेळी क्‍वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे शाखेच्या अध्यक्षा डॉ. रजनी इंदुलकर, विजया रुमाले आदी उपस्थित होते. वर्तणूक आधारे सुरक्षितता या विषयावर वास्तववादी प्रबंधाचे सादरीकरण जेसीबी इंडिया लिमिटेड, तळेगाव या उद्योग समूहातील तानाजी सपकाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी करून सुवर्ण पदक मिळविले. हनुमंत बनकर, रवींद्र धोत्रे, रुपेश यादव, परवीन तरफदार, निखिला शिरोडकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. चंद्रशेखर रूमाले, विजय कांबळे यांनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like