Bhosari News: मित्राचा खून करून पळून जाणाऱ्या आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी

खून केल्यानंतर आरोपी लातूरला पळून जात होते. भोसरी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा सोलापूर महामार्गावर पाठलाग करून अटक केली.

एमपीसी न्यूज- जिवलग मित्र असलेल्या मित्रांनीच सराईत गुन्हेगार मित्राचा खून केला. खून केल्यानंतर लातूर येथे पळून जात असताना भोसरी पोलिसांनी त्यांना शिताफीने अटक केली. आरोपींना न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

रोशन हरी सौडतकर (रा. दिघी रोड, भोसरी), मंगेश शुक्राचार्य मोरे (रा. देवंग्रा, ता. औसा, जि. लातूर), प्रणेश चंद्रकात घोरपडे (रा. विजयनगर, दिघी), शुभम बलराम वाणी (रा. चौधरी पार्क दिघी), वैभव तान्हाजी ढोरे (रा. भवानी पेठ, काशेवाडी, पुणे) अशी भोसरी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अन्य दोन आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे.

मयूर हरिदास मडके (वय 26, रा. मरकळ रोड, आळंदी) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगारचे नाव आहे. मृत मयूरचा मित्र दिनेश खेताराम चौधरी (वय 21, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जुन्या भांडणाच्या तसेच हातावर टॅटू काढण्याच्या कारणावरून हा प्रकार झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. खून केल्यानंतर आरोपी लातूरला पळून जात होते. भोसरी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा सोलापूर महामार्गावर पाठलाग करून अटक केली.

आरोपींना सोमवारी (दि.10) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मृत मयूर हा देखील सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर भोसरी, दिघी, आळंदी आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

अशी घडली खुनाची घटना –
मृत मयूर आणि आरोपी हे एकमेकांचे जिवलग मित्र होते. शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मयूर आणि त्याचे दोन आरोपी मित्र दिघी रोड येथील साईसिद्ध सोसायटीत श्रीकांत गव्हाणे यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीमध्ये दारू प्यायला बसले होते.

त्यानंतर आणखी काही मित्र दारू पिऊन तिथे आले. त्यांच्यात जुन्या भांडणाच्या कारणावरून तसेच हातावर टॅटू काढण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून आरोपींनी मयूर याच्यावर कोयत्याने वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या मयूरचा मृत्यू झाला.

याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 302, 324, 352, 143, 144, 146, 147, 148, 149, आर्म अॅक्ट कलम 4 (25) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खून करून आरोपी लातूरला जाण्याच्या तयारीत –

आरोपी खून केल्यानंतर लातूर येथे पळून जाण्याच्या तयारीत होते. त्यानुसार दोन दुचाकीवरून त्यांनी लातूरच्या दिशेने प्रस्थान देखील केले होते. याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. भोसरी पोलिसांनी तपासचक्रे फिरवून आरोपींचा तांत्रिक विश्लेषण करून शोध घेतला.

पोलिसांनी एक पथक बनवून सोलापूर महामार्गावर त्यांचा शोध घेतला. आरोपी निघाल्यानंतर पोलीस अर्धा-पाऊण तासाने निघाले. त्यामुळे आरोपींना पकडणे जवळपास अशक्य होते.

मात्र, आरोपी दुचाकीवरून जात होते आणि पोलीस कारमधून त्यांचा पाठलाग करीत होते. हडपसरपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर पोलिसांनी आरोपींच्या दुचाकीला ओव्हरटेक केले. अर्ध्या रस्त्यात आरोपींना पकडल्यास आरोपी शेतात पळून जाण्याची शक्यता होती.

त्यामुळे पोलिसांनी पुढे जाऊन पाटस टोल नाक्यावर आरोपींना पकडण्यासाठी सापळा लावला. टोल नाक्यावर आरोपींच्या दुचाकीचा वेग कमी झाला आणि याचाच फायदा घेत पोलिसांनी आरोपींना गराडा घालून ताब्यात घेतले.

या गुन्ह्यात एकूण नऊ आरोपी आहेत. त्यातील पाच आरोपी भोसरी पोलिसांनी पकडले. दोन आरोपी गुन्हे शाखेने पकडले असून आणखी दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.