Bhosari News : लाखो रुपये खर्चूनही अत्यवस्थ बनलेल्या रुग्णाला अखेर पालिकेच्या रुग्णालयात मिळाली ‘संजीवनी’

एमपीसी न्यूज – कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळल्याने रुग्णालयात स्वतःहून भरती झालेला रुग्ण उपचारादरम्यान अत्यवस्थ झाला. लाखो रुपये खर्चून देखील रुग्णाच्या प्रकृतीत काहीच फरक पडला नाही. शेवटचा पर्याय म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले अन तिथल्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले. अवघ्या 14 दिवसांत अत्यवस्थ रुग्ण ठणठणीत बरा झाला.

सदगुरु नगर, भोसरी येथील अरुण धावडे भोसरी मधील एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. कंपनीतील काही सहकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे स्वतःहून कोरोनाची चाचणी करून धावडे रुग्णालयात दाखल झाले. भोसरी मधील संत ज्ञानेश्वर रुग्णालयात त्यांना सुरुवातीला दाखल करण्यात आले.

धावडे यांचे नातेवाईक समीर दाभाडे यांनी याबाबत माहिती दिली, दाभाडे म्हणाले, “संत ज्ञानेश्वर रुग्णालयात त्यांच्यावर दोन ते तीन दिवस उपचार करण्यात आले. रुग्णालय प्रशासनाने काही हजार रुपयांचे बिल केले. दिवसेंदिवस प्रकृती खालावली त्यामुळे तिथले बिल भरून धावडे यांच्या मित्रांनी त्यांना थेरगाव येथील बिर्ला रुग्णालयात दाखल केले. तिथे देखील त्यांच्यावर तीन दिवस उपचार करण्यात आले.

दाभाडे पुढे म्हणाले, “बिर्ला रुग्णालयात उपचार सुरु असताना धावडे यांचे एक डॉक्टर नातेवाईक रुग्णालयाच्या संमतीने त्यांना भेटण्यासाठी गेले. मात्र रुग्णालयाकडून धावडे यांच्यावर केल्या जाणाऱ्या उपचाराची व्यवस्थित माहिती देण्यात आली नाही. तीन दिवसात एक लाख 67 हजार बिल झाले.

त्यानंतर धावडे यांनी आम्हा कुटुंबियांना मेसेज केला की, इथे माझ्यावर व्यवस्थित उपचार होत नाहीत. मला दुसरीकडे शिफ्ट करा. त्यानुसार, आम्ही पुन्हा त्यांना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु झाले. 14 दिवस उपचार घेतल्यानंतर धावडे यांची प्रकृती ठणठणीत झाली. ते कोरोनमुक्त होऊन घरी परतले. खाजगी रुग्णालये उपचाराच्या नावाखाली लूट करीत आहेत. यावर आळा बसणे आवश्यक असल्याचे मत दाभाडे यांनी व्यक्त केले.

डॉ. विनायक पाटील, डॉ. संदीप पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या प्रयत्नामुळे धावडे यांची प्रकृती व्यवस्थित झाली असल्याचे समीर यांचे बंधू सागर दाभाडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.