Bhosari News : अपात्रतेविरोधातील स्थगिती प्रस्तावास मंजुरी; नंदकुमार लांडे यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा

एमपीसीन्यूज : अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष नंदकुमार लांडे यांच्या विरोधातील तक्रारींच्या चौकशीत सहकारी संस्थेच्या ( प्रशासन) अप्पर आयुक्तांनी त्यांना अपात्र घोषित केले होते. यावर लांडे यांनी सहकार मंत्र्यांकडे स्थगिती प्रस्ताव दाखल केला होता. आता या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने लांडे हे पुन्हा निवडणूक लढविण्यास पात्र ठरले आहेत. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळाने अभिनंदन करीत त्यांचा सत्कार केला.

यावेळी बँकेचे अध्यक्ष प्रा. राजेश सस्ते, उपाध्यक्ष मनोज बोरसे, संचालक ॲड. घनःशाम खलाटे, सुलोचना भोवरे, गणेश पवळे, दीपक डोळस, तज्ज्ञ संचालक सीए अमेय दर्वेे व मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते.

बँकेच्या विकासाची गती वेगाने चालू असताना बँकेच्या काही सभासदांनी वैयक्तिक आकसापोटी बँकेच्या विरुध्द मोठे षडयंत्र रचले. त्यांनी सातत्याने बँकेच्या सभासद, ठेवीदार, खातेदार यांच्यात सोशल मिडीयाचा वापर करुन संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच सहकार खात्याकडेही त्यांनी अनेक तक्रारी केल्या, असे बँकेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहेेे.

या तक्रारीनुसार सहकार खात्यामार्फत बँकेचे कायदा कलम 81 अन्वये चाचणी लेखा परिक्षण झाले तसेच कायदा कलम 83 अन्वये चौकशीही झाली. या चौकशीमध्ये बँकेस कोणत्याही प्रकारची आर्थिक तोशिष लागली नसल्याचे तपासणी अधिकाऱ्यांनी आपल्या तपासणी अहवालामध्ये नमूद केले आहे, असे पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, तक्रारदार सातत्याने करत असलेल्या संभ्रमाच्या वातारणामुळे बँकेच्या एकूणच आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होत गेला, असा आरोप पत्रकात करण्यात आला आहे.

बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य तसेच अधिकारी व सेवकांनी संभ्रमीत झालेल्या सभासदांना, ठेवीदारांना व खातेदारांना बँकेविषयीची विश्वासार्हता वाढवून बँकेचे आर्थिक व्यवहार वाढविण्यासाठी शाश्वत केले. त्यामुळे आज रोजी बँक पुन्हा पूर्वपदावर येऊन प्रगतीच्या व सक्षमतेच्या दृष्टीने वाटचाल करत आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष प्रा. राजेश सस्ते यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.