PCNTDA News: प्राधिकरणाचा सेक्टर बारामधील गृहप्रकल्प लांबण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनमुळे मजूर गावी गेल्याचा परिणाम पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या भोसरी येथील सेक्टर क्रमांक 12 येथे सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील गृह प्रकल्पावर झाला आहे. मजूर नसल्याने कामाचा वेग कमी झाला आहे. परिणामी, प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब होण्याची शक्यता असून प्रकल्पाचे काम रेंगाळू शकते.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने भोसरी येथील सेक्टर क्रमांक 12 येथे  गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. 52 हेक्टर क्षेत्रापैकी 9.43 हेक्टर क्षेत्रावर प्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पामध्ये 11 मजल्याच्या एकूण 45 इमारती आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठीचा हा गृहप्रकल्प आहे. यात वन, टू बिचके  सदनिका असणार आहेत.

आर्थिक  दुर्बल गटासाठी 29.55 चौरस मीटर चटई क्षेत्राच्या 3317 आणि अल्प उत्पन्न गटासाठी  59.27 चौरस मीटर चटई क्षेत्राच्या 1566 सदनिका असणार आहेत. सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, दिव्यांग नागरिकांसाठी सदनिकांचे आरक्षण असणार आहे. गृह संकुलातील नागरिकांच्या सोयीसाठी 140 दुकाने असणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

या गृहप्रकल्पाचे काम वेगात सुरू होते. 65 टक्के काम पूर्ण झाले असून मार्च 2022 ला प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन होते. अनेक नागरिकांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार होते. पण, कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेत  पिंपरी- चिंचवड शहरात मोठ्या संख्येने रुग्ण वाढू लागले. त्यामुळे कामगार वर्ग धास्तावला.

लॉकडाऊनच्या भीतीने अनेक कामगार आपल्या मूळगावी गेले. त्याचा गृह प्रकल्पाच्या कामावर मोठा परिणाम झाला आहे. कामगारांची संख्या कमी असल्याने मर्यादित क्षमतेने काम सुरू आहे. त्यामुळे मुदतीत काम पूर्ण होण्याची आशा मावळली आहे.  कामगारांअभावी प्रकल्प रेंगाळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

 प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर म्हणाले, “सेक्टर क्रमांक 12 येथे 45 इमारतीच्या गृह  प्रकल्पाचे काम सुरू आहे. आतापर्यंत 65 टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्च 2022 ला काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. काम चालू असून सध्या 100 टक्के कामगार नाहीत. थोडेफार गावी गेले आहेत. पण, काम चालू आहे. चालू असलेली कामे वेगात सुरू आहेत. काम ठप्प झालेले नाही. प्रकल्पाचे काम लांबणीवर जाईल का हे आता सांगता येणार नाही”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.