Bhosari news: भोसरी रुग्णालयात आयसीयूचे 10 बेड उपलब्ध होणार; नगरसेवक रवी लांडगे यांच्याकडून कामाची पाहणी

एमपीसी न्यूज – नगरसेवक रवी लांडगे यांच्या पाठपुराव्याने भोसरी रुग्णालयात आयसीयूचे 10 बेड उपलब्ध होणार आहेत. नगरसेवक लांडगे यांनी आज (सोमवारी) रुग्णालयात जाऊन कामाची पाहणी केली. बेडसाठी ऑक्सिजन पुरवठ्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून ते रुग्णांसाठी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावेत आणि कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे जीव वाचवावेत, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला केली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या आणि उपलब्ध बेडच्या संख्येमध्ये खूप मोठी तफावत निर्माण होत आहे. विशेषतः गंभीर रुग्णांसाठी लागणाऱ्या आयसीयू बेडची कमतरता चिंता वाढवणारी आहे. अशा परिस्थितीत भाजपचे नगरसेवक रवि लांडगे हे महापालिकेच्या भोसरी रुग्णालयात आयसीयू विभाग (अतिदक्षता विभाग) सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने अखेर भोसरी रुग्णालयात 10 बेडचा आयसीयू विभाग तयार केला आहे. तसेच या विभागाच्या शेजारीच आणखी 10 बेड उपलब्ध केले जाणार आहेत.

गेल्या वर्षी भोसरी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आयसीयू आणि ऑक्सिजन बेडची सर्वात जास्त गरज असतानाही भोसरी रुग्णलयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे भाजपचे नगरसेवक रवी लांडगे यांनी भोसरी रुग्णालयात जाऊन सर्व रुग्णालयाचाच आढावा घेतला.

_MPC_DIR_MPU_II

या रुग्णालयात आयसीयू विभाग अत्यंत गरजेचा असल्याचे त्यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. शहरात कोरोनाने पुन्हा एकदा उग्र रुप धारण करण्यास सुरूवात केल्यामुळे भोसरी रुग्णालयात आयसीयू विभाग तातडीने सुरू करण्याची मागणीही त्यांनी आयुक्तांकडे केली होती.

प्रशासनाकडे त्यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेने भोसरी रुग्णालयात 10 बेडचा आयसीयू विभाग तयार केला आहे. त्याचे काम पूर्णत्वास येत आहे. तसेच आयसीयू विभागाच्या बाहेरच मोठी जागा असल्याने तेथे आणखी 10 बेड उपलब्ध केले जाणार आहेत.

या बेडसाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना उपलब्ध करून द्यावेत. जेणेकरून काही रुग्णांचा जीव वाचवणे शक्य होईल, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला केली. त्यामुळे भोसरी रुग्णालयातील आयसीयू विभाग लवकर कार्यान्वित होऊन तो गंभीर रुग्णांसाठी जीवनदान ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.