Bhosari News: फसवणुकीच्या गुन्ह्यातील तब्बल चार कोटींच्या 38 कार मूळ मालकांना परत, माजी सरपंच गजाआड

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील साबळेवाडीच्या माजी सरपंचाला भोसरी पोलिसांनी अटक केली. माजी सरपंचाकडून पोलिसांनी तीन कोटी 90 लाख रुपये किमतीच्या 38 कार जप्त केल्या. या कार मूळ मालकांना मंगळवारी (दि. 23) परत करण्यात आल्या.

भोसरी पोलीस ठाण्यात झालेल्या या कार्यक्रमासाठी उपायुक्त मंचक इप्पर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

सागर मोहन साबळे (वय 34, रा. साबळेवाडी, ता. खेड) याला पोलिसांनी अटक केली आहे. साबळे हा नागरिकांकडून गाड्या भाड्याने घ्यायचा, त्याबाबत कायदेशीर अॅग्रीमेंट देखील तयार करायचा. काही दिवस भाडे देऊन नंतर भाडे थकावून त्या गाड्यांची कमी किमतीत विक्री करायचा. हा फॉर्म्युला वापरून साबळे याने अनेकांना गंडा घातला. पोलिसांनी तपासा दरम्यान ऑडी, फॉक्सवॅगन, टोयोटा इनोव्हा, महींन्द्रा, मारुती सुझुकी, टाटा, हयुदाई या सारख्या महागड्या कंपन्यांच्या एकूण 23 गाडया हस्तगत केल्या.

तसेच निलेश गोजालु (रा. कासारवाडी, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून भोसरी आणखी 15 महागडया गाड्या जप्त केल्या. वरील दोन्ही गुन्हयात आरोपीला 15 दिवस पोलीस कोठडी घेण्यात आली. पोलीस कोठडीमध्ये असताना पोलिसांनी बीड, माजलगाव, औरंगाबाद तसेच पुणे याठिकाणावरून दोन्ही गुन्हयामध्ये तीन कोटी 90 लाखांच्या 38 कार जप्त केल्या.

जप्त केलेल्या वाहनांच्या मूळ मालकांना त्याच्या कार परत देण्यात आल्या. नागरिकांनी वाहने भाड्याने देताना तसेच वाहनांशी संबंधित कोणतेही व्यवहार करताना काळजी घ्यावी. सर्व बाबींची खातरजमा करावी, असे आवाहन उपायुक्त मंचक इप्पर यांनी यावेळी बोलताना केले.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक प्रशांत साबळे, पोलीस हवालदार बोयणे, पोलीस हवालदार राजू जाधव, पोलीस नाईक अजय डगळे, पोलीस नाईक बाळासाहेब विधाले, पोलीस नाईक पोटे, पोलीस शिपाई सागर जाधव, पोलीस शिपाई आशिष गोपी यांनी केली.

कार मालक आणि फिर्यादी विशाल खेडकर म्हणाले, ‘ऐन दिवाळीत सुद्धा पोलिसांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन वाहने जप्त केली आहेत. पोलिसांमुळे गाडी परत मिळाल्याचा आनंद आहे.’

कार मालक सविता येवलेकर म्हणाल्या, ‘आपली फसवणूक झाल्याचं समजल्यानंतर खूप दुःख झालं, भीती वाटली. पण पोलिसांनी आमच्या गाड्या परत मिळवून दिल्या. त्याबद्दल पोलिसांचे खूप आभार.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.