Bhosari News: पवना नदीच्या निळ्या पूररेषेत राडारोडा टाकल्याप्रकरणी 54 जणांवर गुन्हा

जालिंदर किसन लांडे, विजया दत्तात्रय लांडे, बाळू किसन लांडे आणि सातबारा उता-यावर नावे असेलेल्या अन्य 51 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज – पवना नदीच्या निळ्या पूररेषेत अनधिकृतपणे राडारोडा टाकून भराव टाकल्याप्रकरणी 54 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडून फिर्याद देण्यात आली आहे.

बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपअभियंता राजेंद्र डुंबरे यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जालिंदर किसन लांडे, विजया दत्तात्रय लांडे, बाळू किसन लांडे आणि सातबारा उता-यावर नावे असेलेल्या अन्य 51 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक भीमसेन शिखरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारवाडी येथे पिंपळे गुरव ब्रिजजवळ पवना नदीच्या पात्रात निळ्या पूररेषेमध्ये आरोपींनी 18 फेब्रुवारी 2020 रोजी अनधिकृतरीत्या मुरूम राडारोडा टाकला. राडारोडा टाकून नदीच्या निळ्या पूररेषेत आरोपींनी भराव केला.

ही बाब पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर विभागाकडून संबंधितांना टाकलेला भराव काढून घेण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, आरोपींनी नदीपात्रात टाकलेला राडारोडा काढून घेतला नाही.

त्यामुळे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडून आरोपींच्या विरोधात महराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 53 व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 क 260, 261, 267, आणि 478 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.