Bhosari News : दादा ! ऐकलं तर बरं होईल, नाहीतर…. – खासदार संजय राऊत

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री अजित पवार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे ऐकत नाहीत, अशी तक्रार शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडे करण्यात आली होती. त्यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले, दादा, ऐकलं तर बरं होईल. नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत.’ असे म्हणत संजय राऊत यांनी आणखी एका चर्चेला तोंड फोडले आहे. भोसरी येथे शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, ‘पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आपले नाहीत. ते आपलं ऐकत नाहीत असं म्हणतात. पण असं कसं चालेल. असं होता काम नये. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा शिवसेनेचा आहे. अजितदादा सुद्धा मुख्यमंत्र्यांचे ऐकतात. आपण त्यांना सांगून बघू. दादा ऐकलं तर बरं होईल. नाहीतर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत, असे सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. आपण अजित दादांसोबत बसून बोलू. आपल्याला एकत्र काम करायचं आहे. त्यामुळे आमच्या लोकांचही जरा ऐकत जा. नाहीतर गडबड होईल.’

पुढे पत्रकारांना उद्देशून ते म्हणाले, चुकीचे लिहू नका. नाहीतर लगेच ब्रेकिंग न्यूज सुरु झाली असेल. मुख्यमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले आहेत. उद्या दिल्लीवर सुद्धा आम्हाला राज्य करायचं आहे. साऊथ ब्लॉक, प्रधानमंत्री कुठे बसतात, गृहमंत्र्यांचे कार्यालय कुठे आहे, याची माहिती घेण्यासाठी ते दिल्लीला गेले असल्याची सारवासारव देखील राऊत यांनी केली.

खासदार संजय राऊत पुढे म्हणाले, ‘भोसरी मधून एकही नगरसेवक निवडून आला नाही, याची खंत आहे. भोसरीतून हात मिळाला असता तर आढळराव पाटील खासदार झाले असते. त्यामुळे आता भोसरी मधून काम सुरु करायला हवं. 55 आमदार असतील तर शिवसेनेचा मुख्यमंत्री होतो. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात 40-45 नगरसेवक आले तरी महापौर शिवसेनेचाच असेल. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेवर शिवसेनेचा भगवा आजपर्यंत फडकू शकला नाही. याची खंत वाटते. या दोन्ही शहरात भविष्यकाळ शिवसेनेचा आहे, असे काम आपण करायला हवे.

व्यासपीठाच्या समोर दरवेळी तेचतेच चेहरे दिसत आहेत. नवीन चेहरे यायला हवेत. व्यासपीठावर गर्दी वाढत आहे. व्यासपीठावरील प्रत्येकाने एक एक जरी नगरसेवक निवडून आणला तरी पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिवसेनेची सत्ता येईल, असे राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले, ‘मागील वेळी चार सदस्यांचा प्रभाग झाला त्याचा फटका शिवसेनेला बसला असे म्हटले जाते. पण हा फटका विरोधकांना का नाही बसला. तर आपला पाया ढेपाळलेला होता. आपण लोकांपर्यंत पोहोचायला कमी पडलो. तुम्ही कोणत्या ध्येयाने, जिद्दीने पुढे जाता हे महत्वाचं आहे. देशभरात ज्या पक्षाची चर्चा होते, त्या पक्षाला मुंबई शेजारच्या शहरात संघर्ष करावा लागतो, हे काही चांगले नाही.

कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील पुण्यात येऊन निवडून येऊ शकतात. घासून आले असतील. पण आले आहेत. आपण सुद्धा घासून तर घासून पण ठासून येऊ. कोल्हापूरचे गडी कोथरूड, पिंपरी-चिंचवडमध्ये आले याचं आम्हाला काही वाटत नाही. पण आमच्या अंगावर येऊ नका. कोणीही आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका, असे सूचक विधानही राऊत यांनी केले.

आलात तर तुमच्या सोबत नाहीतर तुमच्या शिवाय….
घराघरात शिवसेना पोहोचली पाहिजे असे म्हणतात. आजवर शिवसेना घराघरात का पोहोचली नाही याचा विचार करा. आघाडी होईल कि नाही यात पडू नका. आपल्याला एकट्याने लढण्याची सवय आहे. आलात तर तुमच्या बरोबर नाहीतर तुमच्या शिवाय, असे म्हणत, शिवसेनेने सगळ्या जागांची तयारी करायला हवी. उद्या आपल्याला घेऊन चर्चेला बसतील आणि एवढ्या जागा घ्या, तेवढ्या जागा घ्या असं म्हणतील. शिवसेना सन्मानाने आघाडी करण्याचा प्रयत्न करेल. पण स्वाभिमान सोडून भगव्या झेंड्याशी आपण तडजोड करणार नाही, असे खासदार राऊत म्हणाले.

पोलीस आयुक्त शिवसेनेचं ऐकत नाहीत
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त शिवसेनेचे ऐकत नाहीत, अशी तक्रार माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी संजय राऊत यांच्याकडे केली. त्यावर राऊत म्हणाले, ‘पोलीस आयुक्त सुद्धा आपलं ऐकत नाहीत अशीही तक्रार केली जात आहे. पोलीस आयुक्तांनाही आपण सांगू.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.