Bhosari News : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरीत मोफत डिजिटल श्रवणयंत्राचे वाटप

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नातून बुधवार (दि. 9) ते रविवार (दि. 13 डिसेंबर) या कालावधीत भोसरी येथे मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दररोज सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत हे वाटप होणार आहे.

लांडेवाडी भोसरी येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन बुधवारी (दि. 9 डिसेंबर) रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमासाठी आमदार दिलीप मोहिते पाटील, प्रकाश बापू पवार, अतुल बेनके, चेतन तुपे, माजी आमदार विलासराव लांडे व विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क विकास मंच, ठाकरसी ग्रुप मुंबई, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे, महात्मा गांधी सेवा संघ आणि ‘जगदंब प्रतिष्ठान’ या संस्थांच्या सहकार्याने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघातील कर्णबधिर ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. पात्र ज्येष्ठ नागरिकांनी यात सहभागी होऊन आपले श्रवणयंत्र बसवून घ्यावे, असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केले आहे.

पुढील विधानसभा विभागांप्रमाणे होईल डिजिटल श्रवणयंत्राचे वाटप…

9 डिसेंबर – भोसरी व आंबेगाव विधानसभा

10 डिसेंबर – खेड विधानसभा

11 डिसेंबर – शिरूर हवेली विधानसभा

12 डिसेंबर – जुन्नर व आंबेगाव विधानसभा

13 डिसेंबर – हडपसर विधानसभा लाभार्थी

खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून फेब्रुवारी महिन्यात शिरुर लोकसभा मतदारसंघात येणा-या जुन्नर, आंबेगाव,खेड, शिरुर-हवेली, हडपसर आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांचे कर्ण तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरातील तपासणीत पात्र ठरलेल्या 1 हजार 156 लाभार्थींना अत्याधुनिक डिजिटल श्रवणयंत्राचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे संयोजन खासदार डॉ. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार विलासराव लांडे करीत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारे हे मोफत श्रवणयंत्र शिबीर यशस्वी करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.