Bhosari News: कारणे सांगू नका, शहरातील वीज समस्या सोडवा – महेश लांडगे

पिंपरी चिंचवड शहरातील वीज समस्यांबाबत आमदार लांडगे यांची महावितरण अधिकाऱ्यांसोबत बैठक

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांसह औद्योगिक पट्टयात वीज पुरवठ्याबाबत नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासह सोशल मीडियावर शेकडो तक्रारी येत आहेत. त्यामुळे महावितरण अधिकाऱ्यांनी आता कारणे सांगू नये. समस्या निकालात काढून नागरिक, व्यावसायिक, उद्योजकांना न्याय दिला पाहिजे; अन्यथा महावितरण प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील वीज समस्यांबाबत आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत महावितरण अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी माजी महापौर नितीन काळजे, नगरसेविका नम्रता लोंढे, अधिक्षक अभियंता तगलपल्लेवार, कार्यकारी अभियंता श्री. गवारी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता चव्हाण आदी उपस्थित होते.

शहरात अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी झाड्याच्या फांद्या पडून तसेच भूमिगत केबलवर पाणी जाऊन केबल नादुरूस्त झाल्या आहेत. त्याची तात्काळ दुरूस्ती करण्याची गरज असल्याचे आमदार लांडगे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

चऱ्होली, प्राईड सिटी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडीत होत आहे तसेच स्पाईन रोड पेठ क्र.4, 6, 9व 11 सह शहरात ठिकठिकाणी अशीच समस्या आहे. त्यासाठी प्रत्येक आठवड्याला कर्मचारी आणि अधिकारी यांची आढावा बैठक घ्यावी, अशी सूचना आमदार लांडगे यांनी केली. पावसाळ्यापूर्वी विद्युत विभागाच्या सर्व कामांच्या दुरुस्तीची कामे त्वरित करण्यात यावीत. वीज पुरवठ्यामध्ये सुसूत्रता यावी, याकरिता आमदार निधीतून केबल चाचणी व्हॅन उपलब्ध करुन देणार आहे, अशी माहिती आमदार लांडगे यांनी यावेळी दिली.

_MPC_DIR_MPU_II

महावितरण प्रशासन दुरुस्तीचे काम करताना वीज पुरवठा खंडीत करते. त्यापूर्वी वीजपुरवठा बंद बाबतचे निवेदन नागरिकांना दिले पाहिजे. अनेकदा वीज पुरवठा खंडीत होणार असल्याची माहिती नागरिकांना नसते. त्यामुळे तक्रारी वाढत आहेत. त्यातुन प्रशासनाला नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रशासनाने ‘शटडाउन’ करण्यापूर्वी नागरिकांना माहिती द्यावी, अशी सूचनाही आमदार लांडगे यांनी केली.

आळंदी रोडवरील वीज पुरवठा सुरळीत करा…

आळंदी रोड परिसरात महापालिका प्रशासनातर्फे रस्त्याचे काम सुरू आहे. संबंधित ठिकाणी खोदाई करताना भूमिगत वीजवाहिनी नादुरूस्त झाली आहे. परिणामी आळंदी रोडच्या पूर्वेकडील भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत आमदार लांडगे यांनी तात्काळ महापालिका बीआरटी विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केला. तसेच संबंधित कंत्राटदारास नवीन केबल टाकण्याच्या सूचना केल्या आहेत.

अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा खपवून घेणार नाही…

विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता कामचुकारपणा करीत आहेत. कोरोनाच्या काळात आयटी क्षेत्रातील कर्मचारी, विविध कंपन्यांतील अधिकारी- कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ करीत आहेत. तसेच, शैक्षणिक क्षेत्रातील विविध कामे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. वीज पुरवठा विस्कळीत असल्यामुळे त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात कामचुकारपणा करणाऱ्या विद्युत कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अशा सूचनाही आमदार लांडगे यांनी केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment