Bhosari news: रोहित्र स्फोटप्रकरण; अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याह दोन तंत्रज्ञांचे निलंबन

शनिवारी (दि.5) सप्टेंबर रोजी विद्युत रोहित्राच्या झालेल्या स्फोटात आजी, आई व लहान मुलगी मृत्युमुखी

एमपीसी न्यूज : भोसरी येथील इंद्रायणी नगरमध्ये विद्युत रोहित्राच्या स्फोटप्रकरणी महावितरणकडून करण्यात आलेल्या प्राथमिक कारवाईत भोसरी येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता व दोन तंत्रज्ञांना निलंबित करण्यात आले आहे.

सध्या या स्फोटाची राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षकांकडून तसेच महावितरणच्या तीन सदस्यीय समितीकडून चौकशी सुरु आहे. हे दोन्ही अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी संबंधीत दोषींविरुध्द शिस्तभंग कारवाई करण्यात येणार आहे.

ही चौकशी सुरु असताना महावितरणकडून प्राथमिक कारवाई म्हणून भोसरी येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता व दोन तंत्रज्ञांना दि. 9 सप्टेंबरला निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तिनही मृतकांच्या कुंटुबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्याची कार्यवाही महावितरणकडून सुरु आहे.

अपघातात पाच महिन्यांची चिमुरडी, आई व आजी यांचा मृत्यू

शनिवारी (दि.5) सप्टेंबर रोजी विद्युत रोहित्राच्या झालेल्या स्फोटात एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या होत्या. यामध्ये शिवन्या सचिन काकडे या पाच महिन्याच्या बालिकेसह तीची आई हर्षदा सचिन काकडे आणि आजी शारदा दिलीप कोतवाल यांचा समावेश होता.

यातील शिवन्या आणि शारदा कोतवाल यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर, हर्षदा काकडे यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. महापौर उषा ढोरे यांनी देखील कोतवाल कुटूंबियाची विचारपूस केली होती. काही दिवसांनंतर हर्षदा यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे दुर्घटनेतील मृतांची संख्या तीन झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.