Bhosari News : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी येथे मोफत श्रवणयंत्र वाटप कार्यक्रम संपन्न

एमपीसी न्यूज – यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क विकास मंच, ठाकरसी ग्रुप मुंबई, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे, महात्मा गांधी सेवा संघ आणि ‘जगदंब प्रतिष्ठान’ या संस्थांच्या सहकार्याने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून शिरुर लोकसभा मतदारसंघातील कर्णबधिर ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून फेब्रुवारी महिन्यात शिरुर लोकसभा मतदारसंघात येणा-या जुन्नर, आंबेगाव,खेड, शिरुर-हवेली, हडपसर आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांचे कर्ण तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरातील तपासणीत पात्र ठरलेल्या 1 हजार 156 लाभार्थींना अत्याधुनिक डिजिटल श्रवणयंत्राचे मोफत वाटप केले जाणार आहे.

बुधवार (दि. 9) ते रविवार (दि. 13 डिसेंबर) या कालावधीत भोसरी येथे मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम दररोज सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत हे वाटप होणार आहे. सुमारे तीन कोटी रुपयांची एक हजार 156 श्रवणयंत्रे वाटप करण्यात येणार आहे.

कार्यक्रमासाठी प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे, शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार, भोसरीचे माजी आमदार विलासराव लांडे, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, देवदत्त निकम, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, वैशाली काळभोर, अजित गव्हाणे, सुनील गव्हाणे, दिलीप वाल्हेकर, गणपत फुलवडे, संजय वाबळे, रवींद्र सोनवणे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, सुलक्षणा धर, पौर्णिमा सोनवणे, वर्षा जगताप, उत्तम आल्हाट, नितीन सस्ते, योगेश गवळी, चंद्रकांत वाळके, धनंजय भालेकर, शैलेश मोहिते, विनायक रणसुभे, अमोल हरपुळे आदी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, “अमोल कोल्हे लोकसभेत जाऊन काय करणार, असा प्रश्न निवडणुकीच्या वेळी विरोधक विचारत होते. तळमळीने काम करणारा उमेदवार लोकसभेत गेल्यावर काय होतं, हे लोकांनी बघितलं आहे. खासदार कोल्हे यांच्या माध्यमातून अनेक कामे शिरूर लोकसभा मतदारसंघात होत आहेत. राष्ट्रवादीच्या विधानसभेतील यशात खासदार कोल्हे यांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदार संघातील अनेक प्रश्न येत्या काही काळात निश्चित सुटतील.”

मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, “पुण्यात नुकतीच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली. सर्व जनतेच्या आशीर्वादाने दोन्ही उमेदवार महाविकास आघाडीचे जिंकले. त्याबद्दल सर्व मतदारांचे आभार. शिरूर लोकसभा मतदारसंघातील दोन रस्त्यांच्या कामासाठी सुमारे 650 कोटींचा निधी खासदार कोल्हे यांनी आणला.

_MPC_DIR_MPU_II

निवडणुकीच्या लोकांच्या मनात जागृत केलेला विश्वास कोल्हे यांनी सार्थ केला, याचा अभिमान आहे. ‘गडाचे मालक असलेल्या कोल्हे यांनी गडकरी यांच्याकडून हा निधी आणला’ असा मिश्किल टोला मंत्री मुंढे यांनी लगावला.

शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला अपंग बांधवांसाठी एक चांगली योजना सामाजिक न्याय मंत्रालयाच्या माध्यमातून जाहीर करण्यात येत आहे.

शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत केंद्र सरकारच्या दुर्लक्षपणाकडे लक्ष वेधत मंत्री मुंढे म्हणाले, “यंत्र देऊन सुद्धा ऐकता येत नसेल, तेंव्हा श्रवणाखाली देण्याची सुद्धा योजना असायला हवी. जिथं मशीन काम करत नाही, तिथं हाताने काम करायला हवं.

शेतकरी दिल्ली येथे कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहेत. त्यांचे तिथे रक्त सांडत आहे. त्या शेतकऱ्यांच्या प्रामाणिक आंदोलनाला भाजपने बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय, ही लाजिरवाणी बाब आहे. शेतकरी जिवंत राहिला तर तुम्ही आम्ही जिवंत राहू. सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला हवे.

खासदार अमोल कोल्हे म्हणाले, “झोपलेल्यांना जागं करणं सोपे आहे. पण झोपेचं सोंग घेणा-यांना जागं करता येत नाही. दिल्ली येथे कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. ते आंदोलनकर्ते 300 रुपये रोज भाड्याने आणले आहेत, असे विधान पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरांनी केले. ते अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे डिजिटल श्रवणयंत्राचा कार्यक्रम बरोबर ठिकाणी सुरु आहे. सत्ताधाऱ्यांना श्रवणयंत्राची गरज आहे.

प्रास्ताविक शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केले. आभार शैलेश मोहिते यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.