Bhosari news: सरकारला खरेदीचा शौक; खरेदीतील मलिद्यासाठी तिघांमध्ये भांडण – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज – राज्य सरकारला ( state Government) खरेदीचा शौक असल्याने तांत्रिक समितीने मान्यता दिल्यानंतरही आदिवासी समाजातील नागरिकांच्या थेट खात्यात अनुदान दिले जात नाहीत. कारण, खरेदीत माल मिळतो. कोणाला किती माल मिळेल यावरून सरकारमधील तीन पक्षामध्ये भांडणे आहेत. या भांडणात आदिवासी समाज विविध योजनांपासून वंचित राहत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला.

तसेच दोन लोक बसण्याची जागा नसलेल्या सोफ्यावर तिघे जण बसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपल्याकरिता मोठ्या प्रमाणात राजकीय स्पेस मिळत असून त्याचा प्रत्यय ग्रामपंचायत निवडणुकीत आला, असेही ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड शहर भाजपतर्फे अनुसूचित जमाती / आदिवासी मोर्चाच्या (Bjp scheduled Tribe Morcha ) वतीने आज (शुक्रवारी) प्रदेश पदाधिकारी, कार्य समिती बैठक, मेळाव्याचे आयोजन केले होते. भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात झालेल्या मेळाव्यात फडणवीस बोलत होते.

महापौर उषा ढोरे, भाजपा प्रदेश प्रभारी ओमप्रकाश धुर्वे, माजी मंत्री गिरीश महाजन, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, भाजपा प्रदेश महामंत्री श्रीकांत भारतीय, प्रदेश सचिव अमित गोरखे, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. अशोक ऊईके, खा. डॉ. भारती पवार, खासदार अशोक नेते, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, एकनाथ पवार आदी उपस्थित होते.

भाजप सरकारच्या काळात आदिवासी समाजासाठी मोठे काम करण्यात आले. समाजावरील 175 कोटींचे खावटी कर्ज माफ करण्यात आले.पेसा अंतर्गत आदिवासी समाजाला थेट पद्धतीने अनुदान देण्यास सुरुवात केली. मात्र, आम्ही घेतलेले निर्णय या सरकारने बंद केले. हा अधिकार त्यांना कोणी दिला, या सरकारला फक्त खरेदीत रस आहे. थेट अनुदान नाकारून आदिवासी समाजासाठी वस्तू खरेदीचा घाट सरकारने घातला असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

आदिवासी समाजाच्या योजना ठप्प आहेत. सरकारमधील तीनही पक्ष तीन वेगवेगळ्या दिशेला चालले आहेत. त्यामुळे राज्याची अवस्था वाईट झाली आहे, असे सांगत फडणवीस म्हणाले, तीन पक्ष एकत्र आले असले तरी घाबरायचे नाही. कारण, त्यांना बसायला जागा नाही. दोन सोफे ठेवले आहेत. एका सोफ्यावर तीन लोक बसायचे आहेत. आपण बसायला एकटे आहोत. त्यामुळे आपल्याला बसायला भरपूर जागा आहे.

दोन लोक बसण्याची जागा नाही अशा सोफ्यावर तिघे जण बसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपल्याकरिता भरपूर जागा निर्माण होत आहे. मोठ्या प्रमाणात राजकीय स्पेस मिळत आहे.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सर्वात मोठी ठरली आहे. साडे पाच ते सहा हजार ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आली आहे. तीन पक्ष एकत्र असूनही एवढ्या ग्रामपंचायतीत ते निवडून येवू शकत नाहीत. तीन पक्ष एकत्र आले तरी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष झाला आहे. म्हणून घाबरून जाण्याचे कारण नाही. देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. भारतीय जनता पक्ष एक मजबूत पार्टी आहे. देशात अनुसूचित जातीचे सर्वाधिक खासदार, आमदार भाजपचे आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

हे ठराव केले पारित !

पंतप्रधान नरेंद्र मोदी, ( Prime Minister Narendra Modi) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदिवासी विकास कार्याबाबत अभिनंदन ठराव प्रदेश महामंत्री तथा भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रकाश गेडाम यांनी मांडला. नवीन सुधारित कृषी विधेयक 2020 ठराव खासदार डॉ. भारती पवार यांनी मांडला. तर 15 नोव्हेंबर हा भगवान बिरसा मुंडा जयंती दिवस राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस घोषित करणे, सुट्टी जाहीर करणे आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याबाबतचा ठराव खासदार अशोक नेते यांनी मांडला. तीनही ठराव पारित करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.