Bhosari News : कोरोना रुग्णांसाठी भोसरी रुग्णालयात आयसीयू युनिट तातडीने सुरू करा : रवी लांडगे

एमपीसीन्यूज : महापालिकेच्या भोसरी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्ण मोठ्यासंख्येने दाखल होत आहेत. परंतु, रुग्णालयात आयसीयू युनिट नसल्यामुळे गंभीर रुग्णांना वायसीएम रुग्णालयात पाठविले जाते किंवा या रुग्णांना खासगी रुग्णालयांचा रस्ता धरावा लागतो. त्यामुळे गंभीर स्वरुपाच्या रुग्णांना खर्च आणि वेळ दोन्ही वाया जात आहे. त्यामुळे तातडीने या रुग्णालयात आयसीयू युनिट सुरु करावे; अन्यथा भोसरीतील जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा नगरसेवक रवी लांडगे यांनी दिला आहे.

या संदर्भात लांडगे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की,

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत भोसरी येथे रुग्णालय उभारण्यात आले आहे. हे रुग्णालय संपूर्ण भोसरी विधानसभा मतदारसंघ आणि आसपासच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वरदान ठरलेले आहे. विशेषतः कोरोना काळात या रुग्णालयाचे महत्त्व आणखी अधोरेखित झालेले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर नवीनच असलेल्या भोसरी रुग्णालयाला कोविड सेंटरमध्ये रुपांतरित करण्यात आले. तेथे कोरोना झालेल्या ५ हजारहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

मात्र, भोसरी रुग्णालयात आयसीयू युनिटची कमतरता आहे. या रुग्णालयात गंभीर आजाराचे अनेक रुग्ण दाखल होत आहेत. परंतु, रुग्णालयात आयसीयू युनिट नसल्यामुळे गंभीर रुग्णांना वायसीएम रुग्णालयात पाठविले जाते किंवा या रुग्णांना खासगी रुग्णालयांचा रस्ता धरावा लागतो. त्यामुळे गंभीर स्वरुपाच्या रुग्णांना खर्च आणि वेळ दोन्ही वाया जात आहे.

आयसीयू युनिट सुरू करण्याकडे दुर्लक्ष

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आयसीयू बेड असणे नितांत गरजेचे असते. परंतु, महापालिकेच्या प्रशासनाने आजपर्यंत या अत्यंत गरजेच्या गोष्टीकडे आजतागायत लक्ष दिलेले नाही. भोसरी रुग्णालयात जागा उपलब्ध असूनही आयसीयू युनिट सुरू करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

एकीकडे कोरोना केअर सेंटर चालविणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयांची नाहक उधळपट्टी होत आहे. कोरोनाच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा दराने साहित्य खरेदी केली जात आहे. परंतु, भोसरी रुग्णालयासाठी गरजेचे असलेले आयसीयू युनिट काही लाख रुपये खर्चून उभे करण्याचा प्रयत्न प्रशासन करत नाही, हे न उलगडणारे कोडे आहे.

‘हा’ राग अद्यापही काहींच्या मनात

याआधी भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाचा डाव रचण्यात आला होता. परंतु, संपूर्ण भोसरीकरांना रस्त्यावर उतरून केलेल्या विरोधानंतर रुग्णालय खासगीकरणाचा डाव उधळला गेला. हा राग अद्यापही काहींच्या मनात आहे.

झारीतील शंकराचार्यांचे कटकारस्थान ?

त्यामुळेच झारीतील शुक्राचार्यांनी भोसरी रुग्णालयात आवश्यक असलेले आयसीयू युनिट उभे राहू नये यासाठी कटकारस्थान रचले आहे काय?, या कटकारस्थानाला महापालिकेचे प्रशासन बळी पडले आहे काय?, असे प्रश्न भोसरीकरांना पडलेले आहेत.

भोसरी रुग्णालयात आयसीयू युनिट सुरू केले जात नसल्याने महापालिकेचे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींबाबत जनतेमध्ये नकारात्मक प्रतिमा निर्माण होत आहे. महापालिकेचा हजारो कोटींचा अर्थसंकल्प, कोट्यवधींच्या वाढीव खर्चांना मंजुरी, नको तेथे नाहक खर्च अशा गोष्टी होत असताना भोसरी रुग्णालयात काही लाखांचा खर्च करून आसीयू युनिट उभे करणे अशक्य नाही.

त्यामुळे महापालिका प्रशासनाचे प्रमुख म्हणून तसेच सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन भोसरी रुग्णालयात तातडीने नव्हे तर युद्ध पातळीवर प्रयत्न करून आयसीयू युनिट सुरू करण्यात यावे;अन्यथा भोसरीकर जनता पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रवी लांडगे यांनी निवेदनात दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.