Bhosari News: धनंजय मुंडे प्रकरणात रेणू नव्हे करुणा शर्माबाबत बोला – चंद्रकांत पाटील

मुंडे यांनी कबुली दिल्याच्या गुन्ह्याबाबत काय?

एमपीसी न्यूज – धनंजय मुंडे (Dhananjay Munde) प्रकरणी रेणू शर्माने (Renu sharme ) दिलेली तक्रार खरी की खोटी याची पोलिसांनी चौकशी करावी आणि मग निर्णय घ्यावा अशी भूमिका भाजपने सुरुवातीपासून मांडली होती. पण, रेणू शर्माची बहिण करुणा (Karuna) सोबत 15 वर्ष माझे शारीरिक संबंध होते. माझ्यापासून असलेल्या दोन मुलांना माझे नाव दिले आणि प्रतिज्ञापत्रात दोन मुले दाखविली नाहीत, हे मुंडे यांनी मान्य केले आहे. हे अनैतिक आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे याबाबत बोलावे, असे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Bjp state President chandrakant Patil) यांनी आज ( शुक्रवारी) राष्ट्रवादीवर शरसंधान साधले.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराची तक्रार करणा-या रेणू शर्माने आज तक्रार मागे घेतली आहे. याबाबत भोसरीत पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आपण कसे क्लिन आहोत हे दाखविण्याचा चाललेला हा प्रयत्न अत्यंत निंदनीय आहे.

धनंजय मुंडे यांच्याबाबत जी घटना घडली. त्यातील रेणू शर्मा विषयात सुरुवातीपासून भाजपने भूमिका मांडली होती की तिची तक्रार खरी की खोटी आहे, याची पोलिसांनी चौकशी करावी आणि मग निर्णय घ्यावा. आम्ही वारंवार रेणू शर्मा व्यतिरिक्त तिची बहिण करुणा शर्मा या विषयावर बोलावे, असेही सांगत होतो.

करुणा शर्मा सोबत 15 वर्ष माझे शारीरिक संबंध होते, हे धनंजय मुंडे यांनी मान्य केले आहे. तिला माझ्यापासून दोन मुले झाली आहेत, त्या मुलांना मी माझे नाव दिले आहे. ती मुले शाळेमध्ये माझ्या नावाने जातात आणि प्रतिज्ञापत्रात  दोन मुले दाखविली नाहीत हे मुंडे यांनी मान्य केले आहे. हे अनैतिक आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे आम्ही मुंडे यांचा राजीनामा मागितला होता. पण, त्यांच्यावरील रेणु शर्माने केस मागे घेतली म्हणजे ते निर्दोष झाले आहेत असे शिताफीने दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

त्यांना क्लिन चिट देण्यात आली. त्यांची बदनामी झाली. बदनामी करणा-या, आंदोलन करणा-या संघटनांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. यामुळे महाराष्ट्रातील नैतिकता संपली का, असा संतप्त सवाल करत पाटील म्हणाले, रामराव आदिक ते एम.जे. अकबर यांनी अशाप्रकारच्या घटना घडल्यानंतर राजीनामा देणे पसंत केले.

15 वर्ष करुणा शर्माबरोबर माझे शारीरिक संबंध होते हे तुम्ही मान्य केले आहे. हे भारतीय कायदा, परंपरेत बसतं काय ?. हिंदू कायद्यात अशा प्रकारे दोन बायकांना परवानगी आहे का?. त्या बायकांपासून झालेल्या मुलांना परवानगी आहे का ?. ती मुले न दाखविण्याला परवानही आहे का ?, असा सवालही त्यांनी केला.

आज मोठ्या प्रमाणावर ढोल वाजविणे चालविले आहे की त्यांना क्लिन चीट मिळाली. रेणू शर्माने केलेली तक्रार बरोबर की नाही. मागे घेताना तिच्यावर दबाव निर्माण झाला का, हे सगळे विषय आमचे नाहीत. त्याची पोलिसांनी चौकशी करावी. भाजपात प्रवेश केलेला कोणीतरी कृष्णा हेगडे यांनी आरोप केला की लगेच भाजपचे हेगडे यांनीही तक्रार केल्याचे सांगितले जाते. त्याचीही चौकशी करावी. करुणा शर्माबद्दल बोला. जे चाललंय हे योग्य नाही. सुसंस्कृत महाराष्ट्राला हे घातक आहे, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

रेणू शर्मा विषयी चौकशी करुन कारवाई करा अशी आमची मागणी होती. त्या विषयात सगळ्यांचे एकमत आहे. करुणा शर्मा प्रकरणात कोणी आरोप केले आणि ते सिद्ध व्हायचेत असे नाही. स्वत: मुंडे यांनी मान्य केले आहे, असेही ते म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.